मायभूमीतच खेळत असल्याचा नेपाळला भास होईल! नेपाळचे सर्व सामने वानखेडेवर होत असल्याचा लाखो नेपाळी नागरिकांना आनंद

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा कार्यक्रम जाहीर होताच मुंबईतील नेपाळी नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच खेळत असलेल्या नेपाळ क्रिकेट संघाचे सर्व साखळी वानखेडे स्टेडियमवर खेळविले जाणार असल्यामुळे या सर्वसामन्यांना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत स्थायिक असलेले नेपाळी नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करणार असल्याचे समोर आले आहे. या सामन्यानिमित्त वानखेडेवर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या चाहत्यांकडून नेपाळध्वज फडकताना पाहून नेपाळ संघाला आपण मायभूमीतच खेळत असल्याचा भास होईल, असा विश्वास शिवसेना नेपाळ आणि जनविकास परिषदेचे अशोक नेपाळी यांनी बोलून दाखवला आहे.

गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडपडत असलेला नेपाळचा क्रिकेट संघ प्रथमच टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला. हा क्षण नेपाळसाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा होता. त्यातच मंगळवारी आयसीसीने वर्ल्ड कपचा 55 सामन्यांचा आपला कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मुंबईतील नेपाळी नागरिकांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. कारण गेल्या अनेक दशकांपासून कामधंद्यासाठी हजारोंच्या संख्येने नेपाळी नागरिक मुंबईत आले ते कायमचे मुंबईचेच झाले. आज त्यांची मुंबईतील लोकसंख्या दोन लाखांच्या घरात असल्याचा आकडाही समोर आला आहे. सध्या मुंबईत चायनीज गाड्या, सुरक्षा रक्षक, घरकाम, स्वच्छता सेवांसारख्या अनेक जागी नेपाळी नागरीक मोठ्या संख्येने काम करत आहेत.

नेपाळ आणि परदेशातूनही चाहते येणार

आपल्या संघाची पाठ थोपटण्यासाठी नेपाळ आणि परदेशातील क्रिकेटप्रेमीही मुंबई गाठणार आहेत. मुंबईत नेपाळ संघाचे वास्तव्य दोन आठवडे असणार असल्यामुळे त्याचदरम्यान परदेशातूनही हजारोंच्या संख्येने नेपाळी मुंबईत येतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. नेपाळचा संघ आपला पहिला सामना 8 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे तर ते 12 फेब्रुवारीला इटलीविरुद्ध भिडतील. तसेच 15 फेब्रुवारीला विंडीज आणि 17 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध नेपाळचा संघ आपला जोरदार खेळ दाखवत वानखेडेवर सनसनाटी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे वानखेडेवर प्रत्येक सामन्याला हजारोंच्या संख्येने नेपाळध्वज फडकताना दिसले तर कुणीही आश्चर्य मानू नये. इतकी तुफान गर्दी वानखेडेवर हमखास होईल, असा विश्वास मुंबईतील नेपाळी आतापासूनच व्यक्त करत आहेत.

एमसीए आणि बीसीसीआयशी संपर्क साधणार

मुंबईत नेपाळी नागरिकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्था क्रिकेट सामन्यानिमित्त पुन्हा एकदा आपल्या नेपाळी बांधवांना एकत्र आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मुंबईत नोकरी-धंद्यासाठी आलेले नेपाळी फार मेहनतीचे काम करतात आणि त्यांचे उत्पन्नही फार कमी असते. त्यामुळे आम्ही आमच्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना स्वस्त दरात तिकिटे मिळावीत म्हणून मुंबई क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निवेदन करणार असल्याचेही नेपाळी यांनी सांगितले.

Comments are closed.