अमृतसरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

अडीच किलो आयईडी जप्त : सीमावर्ती भागात अन्यत्रही कारवाया

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाबच्या अमृतसर ग्रामीण पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेवर दोन दहशतवाद्यांना अटक केली. हे दोघे भाऊ असून त्यांच्याकडून अडीच किलो आयईडी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. गुप्तचर यंत्रणेच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.

बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये दोन दहशतवाद्यांना अडीच किलो आयईडीसह अटक करत पाकिस्तानचे नापाक कट उधळून लावल्याची माहिती बुधवारी सकाळी देण्यात आली. तसेच अन्य कारवायांमध्ये फाजिल्कामध्ये दोन तरुणांना एक पिस्तूल, मॅगझिन आणि काडतुसांसह अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे, अमृतसर, तरनतारन आणि फिरोजपूर या सीमावर्ती जिह्यांमध्ये पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेले 10 किलो हेरॉइन, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. पाच ड्रोन देखील जप्त करण्यात आले.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने स्फोटके पाठवणे पुन्हा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अमृतसर पोलिसांनी सीमावर्ती भागात गस्त वाढवली. मंगळवारी रात्री उशिरा दोन दहशतवादी आयईडी घेण्यासाठी मोटारसायकलवरून त्यांच्या घरातून निघाले, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. शोधमोहीमेदरम्यान, त्याच्या ताब्यातून सुमारे 2.5 किलो वजनाचा आयईडी जप्त करण्यात आला.

Comments are closed.