वडिलांची हत्या केल्यानंतर शिपायानेही आत्महत्या केली.
वृत्तसंस्था/ लखीसराय
बिहारमधील लखीसराय येथील एका आयटीबीपी जवानाने आपल्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर पिस्तूलने स्वत:वर गोळी झाडली. जिह्यातील बरहिया पोलीस स्टेशन परिसरातील खुठा चेतन टोला येथे ही घटना घडली. विकास कुमार असे संबंधिताचे नाव असून तो सध्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलामध्ये तैनात होता. अलिकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान तो छपरा येथे ड्युटीवर होता. मृतांची नावे स्पष्ट झाली असून उदय शंकर सिंग (वय 68 वर्षे) आणि त्यांचा मुलगा लाटो उर्फ विकास कुमार (वय 35 वर्षे) अशी ओळख पोलिसांनी उघड केली आहे.
विकास कुमार आयटीबीपीमध्ये सेवा बजावत होता. अलिकडेच तो विधानसभा निवडणूक ड्युटीसाठी तैनात होता. निवडणुका संपल्यानंतर विकास घरी परतला. याचदरम्यान, मंगळवारी रात्री त्याचा पत्नीशी कशावरून तरी वाद झाला. या वादात वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी रागाच्या भरात विकासने पिस्तूल काढून वडिलांवर गोळी झाडली. वडील उदय शंकर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो आपल्या पत्नीला मारण्यासाठीही धावला. परंतु ती कशीबशी पळून जाण्यात यशस्वी झाली. याचदरम्यान आपले वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून विकास कुमारने पिस्तूलने स्वत:वर गोळी झाडत जीवनयात्रा संपवली.
Comments are closed.