व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, दोन सैनिक गंभीर जखमी; हल्लेखोराची ओळख पटली

व्हाइट हाऊसपासून काही अंतरावर दोन सैनिकांवर गोळीबार करणारा संशयित हल्लेखोराची ओळख पटली आहे. हल्लेखोर अफगाणिस्तानचा असून त्याचे नाल रहमानुल्ला लाकानवाल आहे. 2021 मधील अफगाणिस्तान माघारीदरम्यान ‘ऑपरेशन अलाइज वेलकम’अंतर्गत तो अमेरिकेत पोहोचला होता, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
घटनास्थळाजवळील फॅरागट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ दुपारी सुमारे 2.15 वाजता लाकानवाल दबा धरून बसला होता. त्याने प्रथम महिला गार्डच्या छातीवर गोळी झाडली आणि नंतर डोक्यावरही गोळी मारल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याने दुसऱ्या सैनिकावरीवरही अंधाधुंद गोळीबार केला. जवळच तैनात असलेल्या तिसऱ्या गार्डने तत्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोराला थांबवले. दोन्ही जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाकानवाल अमेरिकेत आल्यानंतर वॉशिंग्टन राज्यात राहत होता. NBC आणि द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, एफबीआय हा हल्ला संभाव्य दहशतवादी कृत्य म्हणून तपासत आहे.
हल्ला रोखण्यासाठी जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि लाकानवाल चार गोळ्या लागून जखमी अवस्थेत अटक झाला. घटनेनंतर त्याला जवळपास निर्वस्त्र अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की तो एकट्यानेच हा हल्ला केला असून अद्याप त्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही.
वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बाउझर यांनी ही घटना “टार्गेटेड शूटिंग” असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यानंतर अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हॅगसेथ यांनी वॉशिंग्टनमध्ये आणखी 500 सैनिक तैनात करण्याचा आदेश दिला आहे. अलीकडील महिन्यांत अनेक राज्यांमधून नॅशनल गार्डचे सैनिक वॉशिंग्टनमध्ये पाठवण्यात आले आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांच्या सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या मोहिमेचा हा भाग असून नंतर हे मिशन इतर अनेक मोठ्या शहरांपर्यंत विस्तारले आहे.
सध्या वॉशिंग्टनमध्ये सुमारे 2,400 नॅशनल गार्ड सैनिक तैनात आहेत.त्यापैकी 958 डीसी गार्डचे असून उर्वरित सुमारे 1,300 सैनिक आठ राज्यांतून आले आहेत. ही तैनाती उन्हाळा 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नॅशनल गार्डच्या सततच्या उपस्थितीवर राजकीय वाद कायम आहे. समर्थकांच्या मते यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली, तर विरोधकांचा आरोप आहे की नागरी पोलीस कामकाज आणि लष्करी हस्तक्षेप यातील सीमारेषा धूसर होत आहेत.

Comments are closed.