राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर नगर-सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ रात्रीच्या वेळी प्राणघातक हल्ला झाला. रात्री हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे परतत असताना 10 ते 15 अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल व सत्तूरसारख्या घातक शस्त्रांनी खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तीन ते पाच समर्थकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर राम खाडे यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तत्काळ पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ल्यादरम्यान स्वसंरक्षणार्थ खाडे यांनी त्यांच्या जवळ असलेल्या पिस्तूलातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून सत्तूरसह काही हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनेमुळे परिसरात तणाावाचे वातावरण पसरले. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. याप्रकरणी आज सकाळपर्यंत कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल झालेली नव्हती. पोलीस प्रशासनाने खाडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर पुढील कारवाई आम्ही करणार असल्याचे सांगितले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Comments are closed.