WPLच्या लिलावात पैसे पाण्यासारखे वाहणार; 73 खेळाडूंचं भवितव्य 41.10 कोटी रुपयांत ठरणार!
महिला प्रीमियर लीग WPL 2026 चा लिलाव आज (27 नोव्हेंबर) नवी दिल्ली येथे होणार आहे. या लिलावासाठी भारत आणि परदेशातील 277 महिला खेळाडूंनी नोंदणी केली आहे, परंतु पाचही संघांमध्ये फक्त 73 खेळाडूंच्या जागा भरल्या जातील. नवीन हंगामापूर्वी, अनेक संघांनी त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंना रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे, लिलावाच्या टेबलावरील बोली लावण्यासाठी जोरदार स्पर्धा होईल. पण त्यापूर्वी, या लिलावात कोणत्या संघाकडे सर्वात जास्त पैसे आहेत आणि कोणत्या खेळाडूंना सर्वाधिक मागणी आहे ते जाणून घेऊया.
महिला प्रीमियर लीग 2026च्या लिलावाच्या टेबलावर यूपी वॉरियर्स हा सर्वात जास्त पैसे असलेला संघ आहे. यूपीकडे 14.5 कोटी रुपये आहेत. गुजरात जायंट्सकडेही 9 कोटी रुपये आहेत. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे ₹6.15 कोटी आहे, तर मुंबई इंडियन्स ₹5.75 कोटी घेऊन लिलावात उतरेल.
महिला प्रीमियर लीग 2026 साठी यूपी वॉरियर्सकडे भरण्यासाठी सर्वात जास्त जागा आहेत. यूपी संघ किमान पाच परदेशी खेळाडूंसह एकूण 17 जागांवर बोली लावेल. गुजरात जायंट्सकडे पाच परदेशी खेळाडूंसह 16 जागा आहेत. आरसीबीकडे 14 जागा शिल्लक आहेत. त्यांना किमान चार परदेशी खेळाडूंची आवश्यकता आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबईकडे प्रत्येकी 13 जागा आहेत, ज्यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी चार जागा आहेत.
यंदा लीगमध्ये अनेक मार्की खेळाडू आहेत ज्यांवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. यामध्ये भारताच्या दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग, न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईन आणि अमेलिया केर, इंग्लंडच्या एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हीली आणि मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड यांचा समावेश आहे. क्रांती गौड, श्री चरणी आणि फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल आणि अष्टपैलू स्नेह राणा देखील सर्व संघांसाठी संघात असतील.
Comments are closed.