ठाणे पालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची मतदार यादी; निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार

ठाणे पालिकेच्या निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेला मतदार याद्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे पालिकेच्या वेबसाईटवर आज चक्क नवी मुंबईतील मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. या ना त्या कारणावरून आधीच गोंधळात सापडलेल्या निवडणूक विभागाच्या बेबंद कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणात आणि मतदार याद्यांमधील घोळ यापाठोपाठ आता पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर चक्क नवी मुंबईच्या मतदार याद्या पाहायला मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मतदार याद्यांमधील नवनवीन घोळ समोर येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. निवडणूक विभागाच्या या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तेव्हा आगामी पालिका निवडणुका अशा पद्धतीने होणार असतील तर या निवडणुकाच पुढे ढकला, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह मनसेने केली आहे.
कंपनीला नोटीस
वेबसाईटवरील तांत्रिक गोंधळाला कंत्राटदार कंपनी जबाबदार आहे. ठाणे पालिकेच्या निवडणूक मतदार यादीसंदर्भातील काम पुण्याच्या अल्टिमेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आले आहे. त्रुटीसंदर्भात या कंपनीला प्रशासनाकडून नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला आहे अशी कबुली ठाणे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळू पिचड यांनी दिली.

Comments are closed.