जमात-ए-इस्लामीच्या अनेक तळांवर छापे

19 वर्षीय तरुणाला अटक : डिजिटल उपकरणे जप्त

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जम्मू काश्मीरमधील पाच जिह्यांमध्ये बंदी घातलेली दहशतवादी संघटना जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित व्यक्तींच्या अनेक ठिकाणांवर पोलिसांनी शुक्रवारी छापे टाकले. छाप्यांदरम्यान पोलिसांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह अनेक कागदपत्रे जप्त केली. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कारवाईचा एक भाग म्हणून शोपियान, पुलवामा, श्रीनगर, बारामुल्ला आणि कुलगाम येथे शोधमोहीम राबवत ही कारवाई करण्यात आली. पोलीस पथकांनी कारवाईदरम्यान पडताळणी करत अनेक व्यक्तींची चौकशी केली. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली जम्मू पोलिसांनी 19 वर्षीय तरुणालाही अटक केली. सदर तरुण पाकिस्तानसह अनेक परदेशी नंबरवर कॉल करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्राथमिक तपासात तो ऑनलाइन कट्टरपंथी बनला होता आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता, असे दिसून आले आहे. अटक करण्यात आलेला तरुण रियासी जिह्यातील रहिवासी असून सध्या तो जम्मूच्या बथिंडी भागात राहत होता. त्याच्याविरुद्ध बहु किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडील डिजिटल उपकरणे जप्त केली असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. बंदी घातलेल्या संघटनांचे पुनरुज्जीवन रोखणे, दहशतवादी समर्थन नेटवर्क्स आणि संशयितांना ओळखून त्यांचा नाश करणे आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांवर कारवाई करणे हे शोध मोहिमेचे उद्दिष्ट आहे. परिसरात कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास कारवाई केली जाईल. स्थानिक रहिवाशांना सहकार्य करण्याचे आणि संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.