धारावी कोळीवाड्याची जमीन हडपतोय अदानी, सीमा निश्चित केल्याशिवाय सर्वेक्षण करण्यास धारावीकरांचा विरोध

सीमा बदलून धारावी कोळीवाड्याची जमीन हडपण्याचे षडयंत्र अदानी समूहाने रचले आहे, असा गंभीर आरोप धारावीकरांनी आज केला. कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन व विस्तारित जमीन निश्चित करा. तोपर्यंत कोणतेही सर्वेक्षण करू नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धारावी कोळीवाड्याचा धारावी विनाश प्रकल्पात समावेश नसतानाही कोळीवाड्याची बाह्य सीमा चुकीची दाखवून अदानी आणि कंपनीकडून स्लम सर्वेक्षण केले जात आहे. हे गंभीर असून भूमिपुत्रांच्या जमिनी व त्यांचे भविष्य हडपण्याचे हे षड्यंत्र आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

धारावी कोळी जमात ट्रस्टने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला. यावेळी अदानी सरकारच्या राक्षसी आणि मुंबईविरोधी वृत्तीच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवले गेले. गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र आपल्या बिल्डर आणि उद्योगपती मित्रांचे हित साधण्यासाठी भाजपा महायुती सरकार भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे कटकारस्थान रचत आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन आदेश असूनही त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या जमिनी व हक्कांवर राज्य सरकार गदा आणू पाहत आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना झोपडपट्टीवासी कसे म्हणता येईल? मुंबईतील सर्व गावठाण आणि कोळीवाड्यांचे बाह्य सीमांकन निश्चित करून त्यांची मॅपिंग मुंबईच्या विकास आराखड्यात करण्यासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली आहे. हा लढा यापुढेही सुरूच राहील, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला.

Comments are closed.