भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट तयार
‘विक्रम-1’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन : 300 किलोपर्यंतचे उपग्रह अवकाशात नेण्यास सक्षम
वैशिष्ट्यापूर्णता…
- 26 मीटर ‘विक्रम-1’ रॉकेटची उंची
- 300 किलो ‘विक्रम-1’ची वहनक्षमता
- 2026 उपग्रह प्रक्षेपित करणार
- स्कायरूट एरोस्पेस ‘विक्रम-1’ची निर्माता कंपनी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, हैदराबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगासमोर अनावरण केले. हे रॉकेट 26 मीटर (अंदाजे 85 फूट) म्हणजेच जवळपास सात मजली इमारतीइतके उंच आहे. हे रॉकेट खासगी अवकाश कंपनी स्कायरूट एरोस्पेसने बनवले आहे. या रॉकेटच्या माध्यमातून पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये उपग्रह प्रक्षेपित केले जातील. हे रॉकेट 300 किलो वजनापर्यंतचा उपग्रह वाहून नेण्यास सक्षम आहे.
पंतप्रधानांनी ‘विक्रम-1’ या रॉकेट व्यतिरिक्त कंपनीच्या नवीन इन्फिनिटी कॅम्पसचेही उद्घाटन केले. या कॅम्पसमध्ये विविध प्रक्षेपण वाहनांची रचना, विकास, एकत्रीकरण आणि चाचणी केली जाईल. हे कॅम्पस तेलंगणातील हैदराबाद येथे असून कंपनीचे मुख्य कार्यालयही तेथेच आहे. स्कायरूट एरोस्पेसची स्थापना 2018 मध्ये पवन कुमार चंदना आणि भरत डाका यांनी केली होती. हे दोघेही आयआयटी पदवीधर आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आहेत. पवन कुमार आणि भरत हे दोघे मित्र असून काही वर्षे इस्रोमध्ये एकत्र काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू करत अवकाश क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
‘विक्रम-1’च्या टीमचे कौतुक
भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’बाबत पंतप्रधानांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. इस्रोने दशकांपासून भारताच्या अंतराळ प्रवासाला चालना दिली आहे. या बदलत्या काळात अंतराळ क्षेत्राचा विस्तार होत आहे. म्हणूनच आम्ही भारताच्या अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा लागू केल्या. केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी नवोपक्रमांसाठीही खुले केल्यानंतर एक नवीन अंतराळ धोरण तयार केले. आम्ही स्टार्टअप्सना नवोपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच माध्यमातून स्कायरूट एरोस्पेससारख्या कंपनीने ‘विक्रम-1’ची केलेली निर्मिती आपल्या संपूर्ण देशवासियांसाठी आदर्शवत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले.
‘स्कायरूट एरोस्पेस’च्या संस्थापकांचे आभार
पंतप्रधानांनी स्कायरूटच्या संस्थापकांचे विशेष आभार व्यक्त केले. आज भारत अंतराळ परिसंस्थेच्या क्षेत्रात खासगी कंपनीच्या माध्यमातूनही मोठी प्रगती करत असल्याचे दिसून येत आहे. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस हे भारताच्या नवीन विचारसरणीचे आणि नवोपक्रमाचे प्रतिबिंब आहे. आपल्या तरुणांची नवोपक्रम आणि जोखीम घेण्याची क्षमता आज नवीन उंचीवर पोहोचत आहे. पवन कुमार चंदना आणि भरत डाका या दोघांनी स्वत:वर विश्वास ठेवत आणि जोखीम घेण्याचे धाडस दाखविल्यामुळेच ‘विक्रम-1’ची निर्मिती झालेली आहे. या कंपनीने भविष्यात अवकाश क्षेत्रात यापेक्षाही मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.
‘जनरेशन-झेड’ला प्रोत्साहन
भारतातील तरुण राष्ट्रीय हितांना प्राधान्य देतात. ते प्रत्येक संधीचा हुशारीने वापर करतात. जेव्हा सरकारने अवकाश क्षेत्र उघडले तेव्हा आमचे जनरेशन-झेड म्हणजेच युवक-तरुण फायदा घेण्यासाठी पुढे आले. सध्या भारतात 300 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स कार्यरत आहेत. या स्टार्टअप्सचे वैशिष्ट्या म्हणजे त्यापैकी बहुतेकांनी अगदी शून्यातून निर्मितीला सुरुवात केली. मात्र, या सर्व लोकांची महत्त्वाकांक्षा मोठी उंची गाठण्याची आहे. आज हे जनरेशन-झेड अभियंते, डिझायनर, कोडर आणि शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान तयार करत आहेत. देशातील तरुणांची ही प्रगती पाहता भविष्यकाळ हा भारताचाच असेल असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
अंतराळ क्षेत्रात ‘स्कायरूट’ची मोठी झेप
देशात सध्या स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉसमॉस, बेलाट्रिक्स एरोस्पेस, ध्रुव आणि अॅस्ट्रोगेट सारख्या कंपन्या रॉकेट निर्मितीत उतरल्या आहेत. स्कायरूटने यापूर्वी 2022 मध्ये ‘विक्रम-एस’ नावाचे एक उप-कक्षीय रॉकेट प्रक्षेपित केले होते. हे रॉकेट उ•ाणानंतर 100 किमी अंतरापर्यंत पोहोचले होते. परंतु पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकले नाही. त्यानंतर आता स्कायरूटचे विक्रम-1 हे भारताचे पहिले खासगी कक्षीय रॉकेट सज्ज झाले. हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यासोबतच 300 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह वाहून नेण्यास सक्षम आहे.
Comments are closed.