पराभवाच्या धक्क्यानंतर ‘तीन नंबर’चा शोध; हिंदुस्थानच्या कसोटी संघात मोठ्या बदलाची शक्यता

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दारुण कसोटी पराभवानंतर हिंदुस्थानच्या कसोटी संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आता फलंदाजीतील महत्त्वाच्या ‘नंबर तीन’ क्रमांकासाठी नवे पर्याय शोधत आहे. राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्या निवृत्तीनंतर हा क्रमांक सध्या अस्थिर बनला आहे.

मधल्या फळीत करुण नायर आणि बी. साई सुदर्शन यांची कामगिरी समाधानकारक ठरलेली नाही. सुदर्शनला अधिक देशांतर्गत आणि ‘हिंदुस्थान अ’ क्रिकेट संघात खेळण्याची गरज असल्याचे मत आहे. त्यामुळे निवड समिती आता अनुभवी देशांतर्गत फलंदाजांकडे वळताना दिसत आहे. ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार आणि रिंपू सिंह ही नावे चर्चेत असून स्मरण रविचंद्रन आणि यश राठोड हे नवखे पर्यायही लक्ष वेधून घेत आहेत. एका माजी निवड समिती सदस्यांनुसार, संघाने आता अष्टपैलूंपेक्षा तज्ञ फलंदाजांवर भर द्यावा. हार्दिक पंडय़ा व नितीश रेड्डी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. रेड्डीची कसोटीतील कामगिरीही समाधानकारक नाही. 10 कसोटींत त्यांची फलंदाजी सरासरी 26 इतकी आहे. त्यातही ऑस्ट्रेलियातील शतकामुळे आकडे बऱ्यापैकी फुगलेले आहेत. 15 डावांत त्यांनी केवळ 86 षटके गोलंदाजी केली आहे. म्हणजे सरासरी सहा षटकेही एका डावात टाकलेली नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानला सध्या नंबर तीनसाठी भक्कम फलंदाज आणि नंबर पाचसाठी विश्वासार्ह
बॅकअपची नितांत गरज आहे.

नंबर तीनसाठी ऋतुराज गायकवाड हा सध्या सर्वात मजबूत दावेदार मानला जात आहे. 43 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 45 पेक्षा अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. चालू हंगामात दोन शतके आणि रणजीत 90 पेक्षा अधिक सरासरी ही त्याच्या फॉर्मची साक्ष देणारी आहे. रजत पाटीदारबाबतही गांभीर्याने विचार केला जात आहे.

Comments are closed.