सांगलीतील नवतरंग मोबाईल शोरूमला पहाटेच्या सुमारास भीषण आग

शहरातील आझाद चौकात असलेल्या नवतरंग मोबाईल शोरूमला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. या आगीत मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, एलईडी क्रीनसह साहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शहरातील मुख्य रस्त्यावर आझाद चौक परिसरातील इमारतीमध्ये मोबाईल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक साहित्याची अनेक दुकाने आहेत. याच ठिकाणी अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपी नावाने विस्तारलेले मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजचे दुकान आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या पहिल्या मजल्यातून आगीचे लोट बाहेर येऊ लागले. या ठिकाणी असलेला हॉटेल कर्मचारी आणि रखवालदाराच्या निदर्शनास ही आग आली. त्यांनी तातडीने याची माहिती दुकान मालक आणि अग्निशमन पथकाला दिली. अग्निशमनच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

दुकानाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याने येथील रेडमी कंपनीचे 120 मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप, सोफासेट, दुकानाच्या दर्शनी भागात असलेला एलईडी क्रीन, दुकानाचा एलईडी बोर्ड, यांसह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. अग्निशमन दलाच्या पथकांनी दोन बंबांच्या साहाय्याने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Comments are closed.