'सुप्रीम' आपत्तीजनक दृश्यांचा निषेध करतो

सोशल मीडियासंबंधी मागविले केंद्राकडून प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सोशल मीडिया, ओटीटी आदी साधनांवरून प्रसारित केल्या जाणारी अश्लील दृष्ये आणि आशयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात चार आठवड्यांमध्ये कठोर नियम स्थापित करावेत, असा आदेश सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वातील पीठाने गुरुवारी दिला आहे. सोशल मीडियावर जो अश्लील आणि बीभत्स आशय प्रसारित केला जातो, त्याचे उत्तरदायित्व कोणाला ना कोणाला घेणे भाग आहे. कारण असे प्रसारण अपोआप होत नाही. केंद्र सरकारने या संदर्भात पुढाकार घेऊन कठोर नियम बनविण्याची आवश्यकता आहे. हे नियम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर असावेत आणि यांचे कार्यान्वयनही तितक्याच कठोरपणे केले जावे. चार आठवड्यात केंद्र सरकारने या प्रश्नी आपले प्रत्युत्तर न्यायालयाला सादर करावे, असेही न्यायालयाने केंद्र सरकारकडे स्पष्ट केले आहे.

टाळण्याची आवश्यकता

काहीवेळा आपण आपला मोबाईल फोन पहात असताना अचानक त्यावर अत्यंत अश्लील अशी दृष्ये किंवा आशय दिसू लागतो. असे प्रकार इतक्या अचानक घडतात, की, तुम्हाला इच्छा नसतानाही ती दृष्ये तुमच्या दृष्टीस पडतात. हे न बघण्याचा तुम्ही निर्णय घेईपर्यंत ते तुमच्या दृष्टीला पडलेले असते. यासंबंधी आधी जो इशारा दिला जातो तो केवळ काही सेकंदाचा असतो. तो पाहता पाहता संपतो. अशा प्रकारे ही दृष्ये पाहण्याची एक प्रकारे सक्तीच केली जाते. हे थांबणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायदा करावा, अशी सूचना खंडपीठाने केली.

जबाबदार समाज बनविणे आवश्यक

आम्ही केंद्र सरकारला एक सूचना करत आहोत. आपल्याला सर्वांना मिळून एक जबाबदार आणि समंजस समाज घडवायचा आहे. केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना करावी. या समितीत विशेषज्ञ असावेत. या समितीत न्यायपालिका आणि मिडियामधील मान्यवरही असू शकतात. त्यांनी सरकारला कठोर नियमांसंबधी सूचना कराव्यात. कठोर नियम जर सर्वसामान्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येत असतील, तर त्यांच्यावर आमच्याकडून विचार केला जाऊ शकतो. एकदा, समाजात उत्तरदायित्वाची जाणीव वाढीला लागली, की मग बऱ्याच समस्या सुकर होतील, असा विश्वासही खंडपीठाने या संदर्भात व्यक्त केला.

‘सिंदूर अभियाना’च्या वेळीही…

हा प्रश्न केवळ अश्लील आशयाच्या संदर्भात नाही. अन्य संबंधांमध्येही आहे. ज्यावेळी ‘सिंदूर अभियान’ हाती घेण्यात आले होते, तेव्हाही असा प्रकार घडला होता. या ‘सिंदूर अभियान’ होत असताना एका व्यक्तीने ‘एक्स’ वर आपण पाकिस्तानचे समर्थक आहोत अशी पोस्ट टाकली. त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नंतर त्याने स्पष्ट केले की त्याने एका तासात ही पोस्ट हटविली आहे. तथापि, त्या एका तासात ती लाखो लोकांनी पाहिली असणे शक्य आहे. मग ती नंतर हटवून फारसे काही साध्य होणार नाही. तेव्हा अशा प्रकारचे आशय लोकांपर्यंत पोहचू नयेत अशी व्यवस्था असावयास हवी. ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशीही टिप्पणी खंडपीठाकडून करण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे..

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. या शोवर अश्लील आशय प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या शोचा समय रैना याच्यावर या शोमधून दिव्यांगांचीही खिल्ली उडविल्याचा आरोप आहे. तसेच मातापित्यांच्या पवित्र नात्यासंबंधीही अश्लील आशय प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी होत असताना खंडपीठाने अश्लील आशयाला रोखण्यासाठी कठोर नियम बनविण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे.

Comments are closed.