आण्विक क्षेत्रातही खाजगी सहभाग

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिले स्पष्ट संकेत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताच्या आण्विक क्षेत्रातही खासगी सहभागाला मोठा वाव आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारत अणुक्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी आम्हाला या क्षेत्रात खासगी सहभाग हवा आहे. भारत आपली ऊर्जची आवश्यकता भागविण्यासाठी अणुऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. यासाठी अत्याधुनिक अणुभट्ट्या भारतातच निर्माण करण्याची आमची योजना आहे. युवकांना, शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना या क्षेत्रात मोठी संधी प्राप्त करुन दिली जाणार आहे, असे आश्वासक व्यक्तव्य त्यांनी गुरुवारी केले आहे. ‘स्कायरुट’ या खासगी कंपनीने निर्माण केलेल्या अग्निबाणाचे ऑन लाईन उद्घाटन केल्यानंतर ते त्यांचे विचार व्यक्त करीत होते. ही कंपनी हैद्राबादमध्ये असून ती स्टार्ट अप कंपनी आहे. ही कंपनी इस्रोच्या माजी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. या कंपनीने भारताचा प्रथम खासगी अग्नीबाण निर्माण केला आहे. याच अग्नीबाणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

अणुक्षेत्रात अमाप संधी

अणुक्षेत्रात भारताच्या तरुणांना अमाप संधी आहे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसीत करण्यावर आम्ही भर देत आहोत. हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी मुक्त करण्याचीही आमची योजना आहे. खासगी क्षेत्राने यात मोठ्या प्रमाणात स्वारस्य दाखविल्यास तंत्रज्ञान विकास आणि संशोधन वेगाने आणि व्यापक प्रमाणात होईल. तसेच अणुऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करता येणेही शक्य आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी आणि उद्योजकांनी या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सज्ज रहावे. आजवर अणुक्षेत्रावर केंद्र सरकारचेच पूर्ण आणि घट्ट नियंत्रण राहिले आहे. ते शिथील करण्यासाठी लवकरच आम्ही एक व्यापक योजना आणणार आहोत. खासगी क्षेत्राला किती प्रमाणात आणि कोणकोणत्या संदर्भात भारताच्या अणुविकास कार्यक्रमात सहभागी होता येईल, यासंबंधीचे नियम आणि अटीही आम्ही साकारत आहोत. लवकरच ही योजना आपल्यासमोर येणार आहे.

त्यामुळे खासगी स्टार्टअप कंपन्या, देशाच्या सर्वांगिण विकासात आपले महत्वपूर्ण योगदान असावे, अशी इच्छा असणारे तरुण संशोधक आणि तंत्रज्ञ, तसेच सुस्थापित खासगी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यांनी यासाठी आतापासूनच त्यांची सज्जता राखण्यासाठी प्रयत्न करावेत. आमचे धोरण सबका विकास, सबका विश्वास असे आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रही आम्हाला वर्ज्य नाही. आता या क्षेत्राने या संदर्भात उत्साहाने पुढे येण्याची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्र पुढे आल्यास भारताच्या आत्मनिर्भरता कार्यक्रमाला मोठे बळ मिळणार आहे. आम्ही आमचा अवकाश संशोधन कार्यक्रम खूपच मर्यादित आर्थिक आधारावर हाती घेतला होता. पण आज त्याचे रुपांतर एका प्रचंड व्यवसायात झाले आहे. अणुक्षेत्रातही अशी प्रगती अल्पावधीत केली जाऊ शकते, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला यशासंबंधी शाश्वती आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.

Comments are closed.