शहापुरात गर्भवतींना अनोखी ‘मातृवंदना’; टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ मातांचा सत्कार

गर्भवती माता व त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी गर्भवती मातांना पोषण आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र, राफा लाईव्ह बियाँड फाऊंडेशन, ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था यांनी ४३ मातांचा सत्कार करून मातृवंदना दिली. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र, राफा लाईव्ह बियाँड फाऊंडेशन, ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टेंभा आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांचे डोहाळे जेवण व ओटी भरणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविकांनी पौष्टिक पदार्थांचे प्रात्यक्षिक करून गर्भवती मातांना आहाराविषयी मार्गदर्शन केले. गर्भारपणात प्रसूती, स्वच्छता, स्तनपान, शासकीय विविध योजना आदींची माहिती मातांना देण्यात आली. या कार्यक्रमात यज्ञा घरत व रविना तुपांगे या मातांनी आपले मत मांडले. यावेळी राफा लाईव्ह बियाँड यांच्याकडून ४३ मातांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.
आरोग्य सांभाळा
पालेभाज्या, गूळ-शेंगदाणे, फळे हे बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी किती आवश्यक याची माहिती देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड, डॉ. कौशल पाटील, राफा लाईव्ह बियाँड फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्कर नाडर, डॉ. स्नेहा रेड्डी, अश्विनी जाधव, ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थाचे अध्यक्ष डॉ. माधव वाघमारे, आरोग्य सहाय्यक संजय पाटील, जयवंत विशे, वर्षा खैरनार आदी उपस्थित होते.

Comments are closed.