एक कोटी रुपये द्या, 11 हजार मते घ्या! भाजपने ‘ईव्हीएम’वाल्याला मॅनेज केले! चांदवडमध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

मतचोरीनंतर आता पैशाच्या बदल्यात मतांची फिक्सिंग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक जिह्यातील चांदवडमध्ये भाजप नेत्याच्या मुलाने अपक्ष उमेदवाराला तशी ऑफर दिली आहे. ‘एक कोटी रुपये द्या, तुमची 11 हजार 250 मते फिक्स्ड करून देतो.

‘ईव्हीएम’वाल्याशी आमचं बोलणं झालं आहे,’ असे तो सांगत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

चांदवडमधील नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. शक्ती ढोमसे नावाच्या व्यक्तीने माझ्याशी मोबाईलवर संपर्क केला. पैशांच्या बदल्यात ईव्हीएममध्ये फेरफार करून मते मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले, असा त्यांचा आरोप आहे.

पोलिसांकडे तक्रार; आयोगालाही क्लिप पाठवली

राकेश अहिरे यांनी याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यासोबत संभाषणाची क्लिपही जोडली आहे. या क्लिपची सत्यता पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. अहिरे यांनी निवडणूक आयोगालाही ही क्लिप आणि पुरावे पाठवले आहेत.

भाजप उमेदवाराची 13 हजार 642 मते फिक्स

या क्लिपमधील संभाषणात ढोमसे याने भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना निवडणुकीत 13 हजार 642 मते मिळणार आहेत, असा ठाम दावा करतानाच, तुम्हीही 1 कोटी द्या, मते मिळवून देण्याची जबाबदारी माझी, ईव्हीएम मशीनवाल्यालाच त्यासाठी मॅनेज केले आहे, अशी ऑफर ढोमसे याने अहिरे यांना दिली आहे.

Comments are closed.