दंतेवाड्यात ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
अबूझमाडमध्ये आयटीबीपीचा तळ : नक्षलवाद्यांचा अखेरचा बालेकिल्लाही उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ दंतेवाडा
छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या अखेरच्या बालेकिल्ल्यालाही आयटीबीपीने सुरुंग लावला आहे. आयटीबीपीने अबूझमाडमध्ये स्वत:चा महत्त्वाचा तळ स्थापन करत छत्तीसगडच्या घनदाट जंगल अन् दुर्गम भागात एक वर्षाचा सामरिक विस्तार पूर्ण केला आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा अखेरचा मोठा आंतरराज्य मूव्हमेंट कॉरिडॉर सील झाला आहे. तर दंतेवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दंतेवाडा जिल्ह्यात 37 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यातील 27 जणांवर 65 लाख रुपयांचे इनाम होते.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलींमध्ये 12 महिला देखील आहेत. हे नक्षलवादी अनेक चकमकींमध्ये सामील राहिले आहेत. मार्च 2020 मध्ये मिनपाच्या जंगलांमध्ये झालेल्या चकमकीत 26 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या चकमकीत सामील नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण पेल आहे.
नक्षलवाद्यांनी पूना मारगेम (पूनर्वसन धोरण) पुढाकाराच्या अंतर्गत पोलीस आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या नक्षलवाद्यांना 50 हजार रुपयांची तात्कालिन मदत दिली जाईल. तसेच रोजगारासाठी प्रशिक्षण, शेतजमीन समवेत अन्य सुविधा प्रदान केल्या जातील. दंतेवाडा जिल्ह्यात मागील 20 महिन्यांमध्ये 508 हून अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवली आहेत. यातील 165 जणांवर इनाम घोषित होते अशी माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली.
आयटीबीपीचा अबूझमाडमध्ये तळ
याचदरम्यान नक्षलवादाच्या विरोधात मोहिमेत आयटीबीपीला मोठे यश मिळाले आहे. आयटीबीपीने 28 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडच्या घनदाट जंगलयुक्त आणि दुर्गम असलेल्या अबूझमाड भागात लंका कंपनी ऑपरेटिंग बेसची स्थापना केली. याचबरोबर सुरक्षा दलाचा एक वर्षाचा रणनीतिक विस्तार पूर्ण झाला आहे. या पावलासोबत नक्षलवाद्यांचा अखेरचा मोठा आंतरराज्य मूव्हमेंट कॉरिडॉर सील झाला आहे.
नक्षलवाद्यांचा अखेरचा बालेकिल्ला
आयटीबीपी आणि छत्तीसगड पोलिसांकडून 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत स्थापन करण्यात आलेला हा 9 वा तळ आहे. या भागाला कधीकाळी नक्षलवाद्यांचा मजबूत बालेकिल्ला मानले जात होते. लंका सीओबी तळाच्या स्थापनेसह नक्षलवाद्यांचा हा कथित अखेरचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे. या तळाला आयटीबीपीची 44 वी बटालियन, छत्तीसगड पोलीस आणि डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे जवान मिळून संचालित करत आहेत. हा तळ महाराष्ट्राच्या सीमेपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे.
नक्षलींचा आंतरराज्य ट्रान्झिट रूट ब्लॉक
हा बाग गडचिरोली (महाराष्ट्र), बिजापूर (छत्तीसगड) आणि तेलंगणाच्या आसपासच्या भागांमध्ये नक्षलग्रस्त भागांना जोडत होता. आता येथे आयटीबीपीचा तळ स्थापन झाल्याने नक्षलवाद्यांचा आंतरराज्य ट्रान्झिट रुट ब्लॉक झाला आहे. हे यश घनदाट जंगलांमध्ये अनेक महिन्यांपर्यंत राबविलेल्या मोहिमेनंतर प्राप्त झाले आहे. नक्षली म्होरक्या बसवराजू हा चकमकीत मारला गेल्यावर मोहिमेला वेग मिळाला होता. तर आयटीबीपीच्या तळामुळे या भागात विकासकामांना वेग मिळणार आहे.
Comments are closed.