तरुण ही विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे.
पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अंतराळ संस्था इस्रोने आयोजित केलेल्या अनोख्या ड्रोन स्पर्धेत ‘जनरेशन-जी’ने सहभाग नोंदवत केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. जेव्हा जेव्हा मी तरुणांचा उत्साह आणि शास्त्रज्ञांचे समर्पण पाहतो तेव्हा माझे हृदय उत्साहाने भरून येते, अशी भावना ‘मन की बात’मध्ये बोलताना गौरवाने सांगितले. तसेच आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाल्याबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि प्राविण्य दाखविण्यासाठी युवा वर्गाने आतापासूनच सज्ज रहावे, असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मेदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा 128 वा भाग रविवारी प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हिडिओने माझे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडिओ इस्रोने आयोजित केलेल्या एका अनोख्या ड्रोन स्पर्धेतील होता. या व्हिडिओमध्ये आपल्या देशातील तरुण, विशेषत: आपले ‘जनरेशन-जी’ मंगळ ग्रहासारख्या परिस्थितीतही ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करताना दिसले. या माध्यमातून युवा वर्गाची निपुणता स्पष्ट होते. अशा उपक्रमांमधून भारतातील युवा पिढी आपली ताकद सिद्ध करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मंगळावर जीसीएस शक्य नाही : पंतप्रधान
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की मंगळ ग्रहावर जीपीएस नसल्यामुळे दिशा, उंची आणि अडथळ्यांचा अंदाज घेण्यासाठी या ड्रोनना केवळ त्यांच्या कॅमेऱ्यांवर आणि बिल्ट-इन सॉफ्टवेअरवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे अनेक ड्रोन पडताना दिसले. मंगळ ग्रहावर जीसीएस शक्य नसल्यामुळे ड्रोन कोणतेही बाह्य सिग्नल किंवा मार्गदर्शन प्राप्त करू शकत नाहीत. त्यामुळे ड्रोन एकामागून एक पडत होते. पण असे अनुभव घेणे चित्तथरारक असल्याचे मोदी म्हणाले.
पुण्यातील तरुणांच्या टीमचा उल्लेख
पंतप्रधान मोदींनी पुण्यातील तरुणांच्या एका टीमचा उल्लेख करत त्यांचे ड्रोन, अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतरही अखेर काही काळासाठी सिम्युलेटेड मंगळ ग्रहाच्या परिस्थितीत उ•ाण केले. या तरुणांचे समर्पण चंद्रयान-2 च्या अपयशाबद्दल आणि चंद्रयान-3 च्या यशाबद्दल आठवण करून देते असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच या टीमचे कौतुक करताना निराशा होऊनही युवा शास्त्रज्ञांनी लगेचच नवीन मोहिमेची तयारी सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तरुणांचा हा उत्साह आणि समर्पण ही विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे यावर त्यांनी भर दिला.
Comments are closed.