तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे
समोरा-समोर धडक : 20 हून अधिक जखमी
व्रतसंस्था/ शिवगंगा
तामिळनाडूच्या शिवगंगा जिह्यातील तिरुपत्तूरजवळ रविवारी दुपारी दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला, दोन मुले आणि एका पुरुष प्रवाशाचा समावेश आहे. या भीषण अपघातात 20 हून अधिक जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती शिवगंगाचे पोलीस अधीक्षक शिव प्रसाद यांनी दिली.
शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस चालकाच्या बाजूने धडकल्या. अपघात झालेली एक बस तिरुप्पूरहून कराईकुडीला जात होती, तर दुसरी कराईकुडीहून दिंडीगुल जिह्यात जात होती. अपघातस्थळावरील फोटोंमध्ये बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिव प्रसाद यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. दोन्ही बस एकमेकांना धडकल्यानंतर रस्त्याच्या मधोमधच थांबल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बसच्या धडकेमुळे काही प्रवाशांचे मृतदेह व साहित्य आजुबाजुला विखुरल्याचे दिसून येत होते. या अपघाताची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात सीटमध्ये मृतदेह अडकल्याचे निदर्शनास येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी प्रवाशांना वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडत बचावकार्य केले.
दक्षिण तामिळनाडूमध्ये एका आठवड्यात सरकारी आणि खासगी बसमधील ही दुसरी मोठी टक्कर आहे. गेल्या आठवड्यात, तेनकासी जिह्यात दोन खासगी बसची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. बसचालक बेपर्वाईने गाडी चालवत असल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाले होते. जखमींपैकी अनेकांना गंभीर दुखापतींसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Comments are closed.