श्रीलंकेला मदत करण्यासाठी 'ऑपरेशन सागर बंधू'
‘दितवाह’मुळे उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत सरसावला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘दितवाह’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत झालेल्या नुकसानीनंतर भारताने या संकटाच्या काळात तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय हवाई दलाने मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमेचा भाग म्हणून ‘ऑपरेशन सागर बंधू’ मोहीम सुरू केली आहे. ‘शेजारी प्रथम’ या भावनेचा पुनरुच्चार करत भारताने आपत्तीग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
‘ऑपरेशन सागर बंधू’ हे भारत आणि श्रीलंकेतील मैत्री आणि प्रादेशिक सहकार्याचे एक संवेदनशील आणि मानवतावादी उदाहरण म्हणून उदयास आले आहे. याच मोहिमेंतर्गत दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावरून मदत साहित्य घेऊन जाणारी सी-130 आणि आयएल-76 विमाने श्रीलंकेसाठी रवाना झाली आहेत. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार ही विमाने 29 नोव्हेंबरच्या रात्री निघाली असून रविवारी सकाळी कोलंबोमध्ये दाखल झाली. या विमानांमध्ये एकूण 21 टन मदत साहित्य, 80 हून अधिक एनडीआरएफ कर्मचारी आणि 8 टन उपकरणे समाविष्ट आहेत. श्रीलंकेला पाठवण्यात आलेल्या पुरवठ्यामध्ये आवश्यक रेशन, औषधे, वैद्यकीय किट, भीष्म क्यूब्स आणि इतर आपत्ती निवारण उपकरणे यांचा समावेश आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे मदत साहित्य पोहोचवण्याव्यतिरिक्त एनडीआरएफ बचाव पथके श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी देखील काम करत आहेत. एक आयएल-76 विमान आधीच कोलंबोमध्ये पोहोचले असून ते मदत साहित्य उतरवून अडकलेल्या भारतीय नागरिकांना घरी परत आणणार आहेत.
हेलिकॉप्टर आणि विमाने तैनात
ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत तात्काळ बचावकार्य करण्यासाठी आणि मदत साहित्य पोहोचवण्यासाठी पथके तैनात केली जात आहेत. मदतकार्य जलद करण्यासाठी भारतीय हवाई दलाने कोलंबोमध्ये एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. ही हेलिकॉप्टर्स बाधित भागात जलद मदत पोहोचवतील. शिवाय, मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हवाई दलाचे सी-17, सी-130 आणि आयएल-76 वाहतूक विमाने सज्ज आहेत.
तामिळनाडूमध्ये बचावकार्य तीव्र
हे ऑपरेशन केवळ श्रीलंकेपुरते मर्यादित नाही. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागात मदत कार्यांना गती देण्यासाठी तामिळनाडूमध्येही मदत आणि बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. हवाई दलाचे विमान आवश्यक उपकरणे आणि बचाव कर्मचारी घेऊन पोहोचले आहेत. एका सी-17 ग्लोबमास्टरने पुण्याहून चेन्नईला आणखी एक एनडीआरएफ टीम आणि जड उपकरणे नेली आहेत. तसेच अतिरिक्त मदत म्हणून वडोदरा येथे एनडीआरएफ टीम आणि त्यांची उपकरणे असलेले दुसरे सी-17 विमानही सज्ज आहे.
Comments are closed.