‘शोले’ मूळ शेवटासह पुन्हा पडद्यावर, ‘इफ्फी’मध्ये रमेश सिप्पी यांनी व्यक्त केला आनंद

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट ‘शोले’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. मात्र या वेळी मूळ क्लायमॅक्ससह म्हणजे मूळ शेवटासह शोले प्रदर्शित केला जाणार आहे. ‘शोले’च्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा गौरव 56 व्या इफ्फी महोत्सवात करण्यात आला. यानिमित्ताने या चित्रपटातील ‘यह दोस्ती हम नहीं छोडेंगे’ या प्रसिद्ध गाण्यातील जय-वीरुच्या मोटरबाईकची प्रतिकृती इफ्फी महोत्सवात ठेवण्यात आली होती. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या मुलाखतीचे सत्रही झाले. या गप्पा सत्रात ‘शोले’ चित्रपट त्याच्या मूळ क्लायमॅक्स दृश्यासह चित्रपटगृहात 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असल्याने रमेश सिप्पी यांनी आनंद व्यक्त केला.
‘शोले’ 15 ऑगस्ट 1975 साली प्रदर्शित झाला. त्या वेळी आणीबाणी असल्याने चित्रपट प्रदर्शनासंबंधीचे नियम बदललेले होते. मूळ चित्रपटाचा शेवट करताना ठाकूर खिळे असलेले बूट घालून गब्बरला मारतात आणि बदला पूर्ण करतात असे दृश्य चित्रित करण्यात आले होते. मात्र तत्कालीन सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तेव्हाचे वातावरण आणि नियम लक्षात घेत ठाकूर स्वतः पोलीस अधिकारी असल्याने ते गब्बरची हत्या करतात हे दृश्य योग्य ठरणार नाही, अशी हरकत घेतली. त्यामुळे ऐनवेळी चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला होता.
रिमेक कदापि नाही
शोले चित्रपटाचा रिमेक कधीही करणार नाही, असे रमेश सिप्पी यांनी स्पष्ट केले. ज्या चित्रपटावर प्रेक्षक गेली 50 वर्षे भरभरून प्रेम करतायेत आणि अजूनही ते कमी झालेले नाही, त्याचा रिमेक करण्याचा प्रश्नच येत नाही, असे रमेश सिप्पी म्हणाले.

Comments are closed.