शिंदेसेनेचा कोथळा अमित शहाच काढतील, संजय राऊत यांचा घणाघात
आजारपणामुळे गेल्या महिन्याभरापासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नसलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांसमोर आले आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सुरू असलेला पैशांचा महापूर, भाजप-शिंदे गटातील रंगलेले वाकयुद्ध, पुढे ढकललेल्या निवडणुका आणि शिवसेना-मनसेच्या युतीवर संजय राऊत यांनी भाष्य केले.
आमचीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या शिंदे गटाचा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. शिंदेसेनेचा कोथळा अमित शहाच काढणार आहेत. शिंदे सेनेचा कोथळा दिल्लीचे शहा काढणार आहेत, ही त्यांच्या कामाची परंपरा आहे. त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. त्यांच्या स्वभावानुसार आणि कार्यपद्धतीनुसार शिंदेसेनेचा कोथळा दिल्लीतूनच काढला जाईल, असे राऊत म्हणाले.
दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. याचाच उल्लेख करत राऊत म्हणाले की, मी गेलेय वर्षभर हेच सांगतोय की शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत गुप्त ऑपरेशन केले आणि आमदार फोडले, त्याच पद्धतीने आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे. ज्याला राजकारण कळते त्याने ते समजून घेतला पाहिजे.
रवींद्र चव्हाण यांचे 2 तारखेबाबतचे वक्तव्य असून मी देखील वारंवार तेच सांगत होतो. शिंदे गटाला वाटत असेल की दिल्लीतील महान नेते आमच्या पाठीशी आहेत. पण ते कुणाच्याही पाठीशी नसतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी, शहा यांना कायदा आणि इतर बाबतीत नियमबाह्य मदत केली. तरीही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही, तिथे शिंदे कोण? असा सवाल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, शिंदेंचा पक्ष फुटलेला असून हा त्यांचा पक्ष नाहीच आहे. अमित शहा यांनी निर्माण केलेला हा गट असून तो पक्ष शहांचा आहे, शिंदेंचा नाही. त्यामुळे माझी शिवसेना खरी आहे हे हास्यास्पद नाही का? कसली यांची शिवसेना, यांनी कधी शिवसेनेला जन्म दिला? यांनी शिवसेनेसाठी काय खस्ता खाल्ला? हे कधी शिवसेनेसाठी तुरुंगात केले? यांनी कोणती आंदोलन केली? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रात आजही मजबुतीने उभी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणे म्हणजे लोकशाही नाही. याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही. एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खाते आणि भरपूर पैसे आहेत. याचा अर्थ निवडणूक आयोग, फडणवीस यांना कळत नाही का? आपण भ्रष्टाचाराच्या झिरो टॉलरन्सची भूमिका घेतो, तेव्हा तुमचा एक मंत्री नगरविकास खाते आमच्याकडे आहे, आम्हाला पैशाची चिंता नाही असे सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केले पाहिजे आणि नगरविकास खाते त्याच्याकडून काढून घेतले पाहिजे, तर तुम्ही राज्याचे नेतृत्व करता असे आम्ही मानतो. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, मनोहर जोशांपर्यंत संस्कारी, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असते ते पाहिले आहे. फडणवीसांकडून अपेक्षा होती पण त्यांना अपयश आलेले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
फडणवीस यांचे राजकारण जर शिंदेंना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये. नुसते पैशावर राजकारण चालत नाही. पैशावर माणसे विकत घेता येतात. मला राज्यातील जनतेचे आश्चर्य वाटते, या राज्याची जनता 10-15 हजारांमध्ये आपल्या मुला बाळांचे भविष्य विकत आहेत. बेरोजगारी, गरिबी तशीच आहे. कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. रोज मुंबईत, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्याच्यावर कुणी बोलत नाही. त्याच्यावर मताला 10-15 हजार उतारा असेल तर या राज्याच्या जनतेने स्वत:ला अशा प्रकारे विकल्याने ते आपल्या पुढल्या पिढीचे भविष्य धोक्यात आणत आहेत. 10-15 हजार जनतेची किंमत आहे का? पण लुटलेला पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा अशा माध्यमातून निवडणुकीत येतो आणि जनता खूश आहे. नगरपालिकेला 10 हजार, विधानसभेला 25 हजार आणि लोकसभेला त्याहून जास्त, ही या राज्याच्या जनतेची कमाई आहे. बाकी नोकऱ्या, धंदे काही नाही, असेही राऊत म्हणाले.
Comments are closed.