HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण…
चंदीगड : भारतात अनेक जण वाहन खरेदी केल्यानंतर त्यासाठी व्हीआयपी वाहन क्रमांक मिळावा यासाठी आग्रही असतात. रस्ते वाहतूक विभागाकडून व्हीआयपी क्रमांकांसाठी विशेष शुल्क घेतलं जातं. काही वेळा व्हीआयपी क्रमांकासाठी बोली देखील लावली जाते. हरियाणातीलअसाच एक प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. एका व्यक्तीनं HR88B8888 या क्रमांकासाठी 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली लावली होती. मात्र, आता पुन्हा त्या क्रमांकासाठी बोली लावली जाणार आहे.
HR88B8888 वाहन क्रमांकाचा पुन्हा लिलाव
HR88B8888 या वाहन क्रमांकासाठी 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली लागल्यानं भारतातील तो सर्वात महागडा वाहन क्रमांक बनला होता. 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली सुधीर कुमार या व्यक्तीनं HR88B8888 साठी लावली होती. सुधीर कुमार हे रोम्युलस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. दोन दिवस ऑनलाईन बोली लावल्यानंतर सुधीर कुमार यांनी HR88B8888 या नंबरप्लेटसाठी 1,17,75,000 रुपयांची बोली लावली होती.
लिलावात बोली लावल्यानंतर सुधीर कुमार यांना या क्रमांकासाठी बोली लावलेली रक्कम म्हणजेच 1 कोटी 17 लाख 75 हजार रुपये 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जमा करायचे होते. मात्र, सुधीर कुमार यांना ती रक्कम जमा करण्यात अपयश आलं. सुधीर कुमार यांनी ही रक्कम शनिवारी दोनवेळा भरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तांत्रिक कारणामुळं ही रक्कम जमा करता आली नव्हती. सुधीर कुमार यांनी ही नंबर प्लेट घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून विरोध झाल्याचं देखील म्हटलं.
सुधीर कुमार यांना HR88B8888 साठीचं शुल्क जमा करण्यात अपयश आल्यानं या क्रमांकासाठी पुन्हा बोली लागणार आहे.
हरियाणात व्हीआयपी क्रमांकासाठी आठवड्यात ऑनलाईन लिलाव केला जातो. अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी सांयकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत असते. त्यानंतर सलग दोन दिवस व्हीआयपी क्रमांक किंवा फॅन्सी क्रमांकासाठी बोली लावली जाते आणि निकाल बुधवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर केला जातो.
गेल्या आठवड्यात HR88B8888 या क्रमांकासाठी सर्वाधिक 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली लागल्यानं जोरदार चर्चा झाली होती. एकूण 45 जणांनी बोली लावली होती. बोली लावण्याची किमान रक्कम 50 हजार रुपये असून HR88B8888 बोली 1 कोटी 17 लाख रुपयांची लागली.
HR88B8888 क्रमांकाचं वैशिष्ट्य काय?
HR म्हणजे हरियाणा राज्य, 88 क्रमांक आरटीओ विभागाचा किंवा जिल्ह्याचा क्रमांक दर्शवतो. B सीरिजचा क्रमांक असून 8 या क्रमांकासारखा दिसतो. चारवेळा 8888 असल्यानं या क्रमांकाला मोठी मागणी असते. दरम्यान, आता या क्रमांकासाठी पुन्हा बोली लागणार असून आता ही बोली कोण जिंकतं आणि ती रक्कम वेळेत जमा करु शकतं का ते पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.