Menstrual Flow Amount: मासिक पाळीदरम्यान किती रक्तस्त्राव नॉर्मल? महिलांनी नक्की काय जाणून घ्यायला हवं
महिलांच्या शरीरात दर महिन्याला अनेक नैसर्गिक बदल होतात. अंडाशयातून तयार होणाऱ्या अंडामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि अंड्याचे फलन न झाल्यास ते रक्ताच्या स्वरूपात बाहेर पडते. हा नैसर्गिक प्रवास म्हणजेच मासिक पाळी.(normal menstrual bleeding how much is normal period flow)
सर्वसाधारणपणे मासिक पाळीचा चक्रकालावधी २८ ते ३० दिवसांचा मानला जातो. मात्र हा कालावधी प्रत्येक महिलेसाठी समान असेलच असे नाही. काहींचा चक्रकाल कमी तर काहींचा जास्त असू शकतो. शरीराच्या रचनेसह आहार, झोप, ताणतणाव आणि जीवनशैलीवरही चक्राचा कालावधी बदलू शकतो.
मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण २ ते ७ दिवस रक्तस्त्राव होणे नैसर्गिक मानले जाते. पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी रक्तस्त्राव तुलनेने जास्त होतो आणि नंतर हळूहळू कमी होतो. हे शरीराच्या चक्राचा सामान्य भाग आहे.
एका महिलेला पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव साधारणतः २० ते ८० मिलीलिटरच्या दरम्यान असतो. मात्र हा आकडा प्रत्येकासाठी सारखा असेलच असे नाही. शरीराची ताकद, वय, पोषण, हार्मोन्सची अवस्था आणि दैनंदिन सवयी यानुसार रक्तस्त्रावात फरक पडू शकतो.
महत्त्वाचं म्हणजे, पाळीदरम्यान तुम्हाला वारंवार पॅड बदलावे लागत असतील, अगदी एक-दोन तासांतच पॅड पूर्ण भिजत असेल, किंवा रक्ताच्या मोठ्या गुठळ्या दिसत असतील तर हा रक्तस्त्राव सामान्य नसू शकतो. अशा वेळी शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. हा बदल एखाद्या हार्मोनल समस्येचा, जास्त ताणाचा किंवा इतर आरोग्याशी संबंधित अडचणीचा संकेत असू शकतो.
महिलांनी आपल्या शरीरात येणारे संकेत नीट ओळखणं महत्त्वाचं आहे. पाळीशी संबंधित बदल ही लाज किंवा दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही. योग्य वेळी शरीरात होणारा प्रत्येक बदल समजून घेणं आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Comments are closed.