महायुतीत ‘मत’युद्धाचा भडका! महाडमध्ये गोगावले-तटकरे समर्थकांमध्ये राडा; गाडय़ा फोडल्या, पिस्तूल रोखले! बदलापूर आणि डहाणूत भाजप-शिंदे गट तर रोह्यात भाजप-दादा गटात धुमश्चक्री

नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानात महायुतीत ‘मत’ युद्धाचा भडका उडाला. महाडमध्ये थेट मतदान केंद्राबाहेर शिंदे गट आणि अजित पवार गटात जोरदार राडा झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या गाडय़ा फोडल्या. परस्परांवर पिस्तूल रोखल्याचाही आरोपही करण्यात आला. डहाणू, बदलापुरात भाजप आणि शिंदे गटात जोरदार धुमश्चक्री झाली. तर रोह्यात भाजप आणि अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकाला कानफटवले.
महाड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना शिंदे गट व अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास हा एका मतदान केंद्रात जात असताना अजितदादा गटाच्या सुशांत जाबरे यांनी आक्षेप घेतला. यामुळे विकासने जाबरे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तर जाबरे यांनी पिस्तूल रोखल्याचा आरोप गोगावले यांनी केला. यावेळी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या राडय़ात काही गाडय़ांची तोडफोडही करण्यात आली. रोह्यातही भाजप अजित पवार गटात राडा झाला. प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये अजित पवार गटाचे उमेदवार समीर सकपाळ व भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये उमेदवारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी दोन्ही गटाच्या महिलाही एकमेकांना भिडल्या. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांचा लाठीमार
बोगस मतदानावरून बदलापूरमध्ये केंद्राबाहेर हुल्लडबाजी करत भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना काही ठिकाणी सोम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच डहाणू येथील काही केंद्रांवर दुबार मतदारांची नावे आढळल्याने गोंधळ उडाला. भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.

Comments are closed.