एप्रिल 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत 2 टप्प्यात जनगणना
केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती : जातनिहाय गणनाही होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘जनगणना 2027’ दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याची जनगणना एप्रिल अणि सप्टेंबर 2026 दरम्यान तर दुसऱ्या टप्प्याची फेब्रुवारी 2027 मध्ये होणार असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत सांगितले आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल तपशील देत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत घरांचे सूचीकरण आणि आवास गणना पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाणार असल्याचे राय यांनी संसदेला सांगितले आहे.
लोकसंख्येची गणना फेब्रुवारी 2027 मध्ये केली जाणार आहे, ज्याची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 रोजीची मध्यरात्र असेल. तसेच केंद्रशासित प्रदेश लडाख आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या हिमाच्छादिन दुर्गम भागांना वगळता ही गणना सप्टेंबर 2026 मध्ये केली जाणार असू याची संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2026 असेल अशी माहिती गृहराज्यमंत्री राय यांनी दिली आहे.
जनगणनेचा इतिहास 150 वर्षे जुना
जनगणनेच्या प्रत्येक कवायतीपूर्वी विविध मंत्रालये, विभाग, संघटना आणि जनगणना डाटा वापरकर्त्यांकडून प्राप्त माहिती आणि सूचनांच्या आधारावर जनगणनेशी संबंधित प्रश्नावलीला अंतिम रुप दिले जाते. जनगणनेचा इतिहास 150 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे आणि प्रत्येक जनगणनेत मागील जनगणनांच्या अनुभवांना विचारात घेतले जाते असे राय यांनी सांगितले.
डिजिटल जनगणना
एका वेगळ्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल राय यांनी मंत्रिमंडळीय समितीकडून घेतलेल्या निर्णयानुसार जनगणनेत जातनिहाय गणनाही केली जाणार असल्याचे सांगितले आहे. 2027 ची जनगणना डिजिटल माध्यमातून केली जाणार असून यात मोबाइल अॅपच्या माध्यमातून डाटा मिळविला जाईल आणि स्वगणनेसाठी ऑनलाइन तरतूद असेल अशी माहिती राय यांनी अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल दिली आहे.
Comments are closed.