बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी प्रेम कुमार यांची निवड
सर्वानुमते निवड, 9 वेळा आहेत विधानसभा सदस्य
वृत्तसंस्था / पाटणा
बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. प्रेम कुमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मंगळवारी ही निवड करण्यात आली. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांची निर्विरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर बिहार विधानसभेत ‘जय श्रीराम’, आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष करण्यात आला.
त्यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहारमधील नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेले. ते आसनावर स्थानापन्न होताच विधानसभेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला.
भगवद्गीतेच्या श्लोकाने प्रारंभ
विधानसभा अध्यक्ष या नात्याने नव्या विधानसभेतील आपल्या प्रथम भाषणाचा शुभारंभ डॉ. प्रेम कुमार यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या एका श्लोकापासून केला आहे. आपली या महत्वाच्या पदावर सर्वानुमते निवड करण्यासाठी त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. माझे कर्तव्य नि:पक्षपातीपणे सर्व सदस्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आहे. विधानसभेच्या नियमांच्या अंतर्गत राहून आपण आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नितीश कुमार यांच्याकडून प्रशंसा
डॉ. प्रेम कुमार हे अनुभवी नेते असून ते सभागृहाचे कामकाज योग्य प्रकारे चालवितील हे निश्चित आहे. त्यांची या पदी निवड झाल्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे वचन देतो, असे गौरवोद्गार नितीश कुमार यांनी काढले. त्यांनी सर्व सदस्यांचेही अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही त्यांचे अभिनंदन करुन त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले. आपला पक्ष आणि आपले पिता लालूप्रसाद यादव यांच्या वतीने मी आपले अभिनंदन करीत आहे, असे प्रतिपादन तेजस्वी यादव यांनी केले.
डॉ. प्रेम कुमार यांचा अल्पपरिचय
डॉ. प्रेम कुमार हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून बिहारच्या गया शहर या मतदारसंघातून ते सलग 9 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते 69 वर्षांचे असून सध्याच्या बिहार विधानसभेत निवडून येण्याच्या दृष्टीने सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या संदर्भात त्यांनी हॅटट्रिकची हॅटट्रिक केली आहे. 1990 पासून गेली 35 वर्षे ते बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे. त्यांनी आतापर्यंत कृषी, पशुपालन, पर्यटन, सहकार, आपदा निवारण आणि पर्यावरण अशी महत्वाचे विभाग मंत्री या नात्याने सांभाळले आहेत. बिहारच्या राजकारणातील एक अत्यंत विश्वासार्ह, एकनिष्ठ आणि जनताभिमुख नेता म्हणून त्यांचा राज्यातील जनतेला परिचय आहे.
Comments are closed.