'कम्युनिकेशन कम्पेनियन' ॲप ऐच्छिक आहे.

केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण, विरोधकांची टीका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मोबाईल्स आणि स्मार्टफोन्समध्ये घातले जाणारे ‘संचार साथी’ हे सुरक्षा अॅप अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. मोबाईलधारक हे अॅप डिलीट करु शकतो, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. प्रत्येक मोबाईमध्ये हे अॅप स्थापित केले जाईल, अशी घोषणा नुकतीच केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर विरोधकांनी या अॅपविरोधात प्रचंड गदारोळ माजविला होता. आता केंद्र सरकारने हे अॅप इच्छा असल्यास मोबाईलधारक इन्स्टॉल करु शकतो, असे स्पष्ट केले आहे.

हे अॅप मोबाईलच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे. हेरगिरी करणे हा त्याचा उद्देश नाही. हेरगिरीची कोणतीही सुविधा या अॅपमध्ये नाही. आपला मोबाईल चोरीला गेल्यास या अॅपच्या आधारे त्याचा माग काढता येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेसाठी हे अॅप प्रत्येक मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अॅपचा उपयोग प्रत्येकाला करता यावा आणि या अॅपच्या उपयुक्ततेची माहिती मोबाईलधारकांना व्हावी, हा महत्वाचा उद्देशही या अॅपमागे आहे. पण ज्याला ते नको असेल, तो ते डिलीट करु शकतो. हे अॅप अनिवार्य नाही, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दिली.

विरोधकांचा गदारोळ

केंद्र सरकार या अॅपची सक्ती करुन नागरीकांवर हेरगिरी करणार आहे. त्यामुळे या अॅपला आमचा विरोध आहे. हे अॅप लोकांच्या खासगीत्वाच्या अधिकारावर गदा आणणारे आहे. पॅगासिस सॉफ्टवेअरसारखे हे अॅप आहे. या अॅपची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली. लोकसभेतही या अॅपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या अॅपसंबंधी हा महत्वाचा खुलासा केला आहे.

प्रियांका गांधी यांची टीका

केंद्र सरकारला या देशात हुकुमशाही आणायची आहे. तशी तयारी करण्यात येत आहे. हे अॅप त्या तयारीचाच एक भाग आहे. हे हेरगिरी करणारे अॅप आहे. मोबाईलमधून पाठविले जाणारे संदेश आणि केले जाणारे कॉल्स यांची माहिती या अॅपद्वारे करुन घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच या अॅपची सक्ती करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.

सरकारचा निर्णय

प्रत्येक मोबाईलमध्ये ‘संचार साथी’ हे अॅप प्रीलोड करण्यात यावे. असा आदेश केंद्र सरकारने नुकताच मोबाईल निर्मिती आणि विक्री कंपन्यांना दिला आहे. या अॅपमुळे मोबाईलची सुरक्षा होणार आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही या अॅपचे समर्थन केले आहे. मात्र ते ऐच्छिक असावे, अशी मागणी केली आहे. आता केंद्र सरकारने या वादावर पडदा टाकला आहे.

7 लाख मोबाईल्सचा शोध

ही सिस्टिम केंद्र सरकारने लाँच केल्यापासून आतापर्यंत सात लाख हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल्सचा शोध लावणे शक्य झालेले आहे. केवळ ऑक्टोबर 2025 मध्ये चोरीला गेलेले 50 हजार मोबाईल्स या अॅपच्या द्वारे शोधण्यात आले आहेत, अशी माहितीही दूरसंचार विभागाकडून देण्यात आली.

काय आहे ‘संचार साथी’

ड संचार साथी अॅप अनेक प्रकारे उपयोगी आहे. त्यातील ‘चक्षू’ हे फिचर धारकाला संशयास्पद कॉल्ससंबंधी सावध करते. खोटे केवायसी अलर्टस्, एसएमएस आणि व्हॉटस्अप संदेश यांच्यापासून संरक्षण करते. आर्थिक फ्रॉडस्पासून सावध करते. फ्रॉडस् ची माहिती सरकारला कळविण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे.

ड स्पॅम आणि नको असलेले कमर्शियल कॉल्स ब्लॉक करता येतात. अशा कॉल्सच्या विरोधात तक्रार करता येते आणि अशा तक्रारींवर सात दिवसांच्या आत कारवाई होते. फिशिंग लिंक्स, असुरक्षित एपीके आणि फ्रॉड वेबसाईटसंबंधी तक्रार या अॅपवरुन करता येते. सायबर धमक्यांविरोधात त्वरित कारवाई होऊ शकते.

ड चोरीला गेलेल्या किंवा हरविलेल्या मोबाईलचा माग काढता येतो. हे अॅप मोबाईलमध्ये बसविलेले असल्यास सहजगत्या मोबाईल कोठे आहे हे त्वरित शोधले जाऊ शकते. तुमच्या अनुमतीशिवाय तुमच्या नावावर किती मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यात आले आहेत, याची माहिती मिळते. हा महत्वाचा उपयोग आहे.

ड आपण विकत घेतलेला मोबाईल फोन ‘खरा’ (जेन्युईन) आहे की नाही, हे या अॅपवरुन समजते. हे अॅप मोबाईलचा आयईएमआय तपासून आपल्याला ही माहिती देते. चोरीला गेलेला मोबाईल त्वरित बंद करण्याची सोय यात आहे. त्यामुळे अशा मोबाईलचा दुरुपयोग होण्याची शक्यता या अॅपमुळे टाळली जाते.

Comments are closed.