कृषी विभागाला पाच हजार कोटी द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, कृषी मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आश्वासनांची पूर्तता झाली नाही

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. पण त्यांची पूर्तता होत नाही. या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे पुरवणी मागण्यांद्वारे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

नवीन पीक विमा योजना घोषित करताना राज्य सरकारच्या होणाऱया बचतीमधून शेती भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलेले आहे. जुनी पीक विमा योजना रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वतः कृषी मंत्री या नात्याने जाहीर भाषणांद्वारे शेतकऱ्यांना दिले होते याची आठवण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे करून दिली आहे.

या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभ देणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे याचा संपूर्ण विचार करता कृषी विभागाला जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Comments are closed.