Sindhudurga News- आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीला होणार

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. बुधवारी सकाळी धार्मिक प्रथा परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची निश्चित केली. यामुळे यात्रेच्या तारखेबाबत भाविकांमध्ये असलेली उत्सुकता संपली असून यात्रेला येण्यासाठी भाविकांनी प्रवास तिकीट बुकिंग करण्याबरोबरच नियोजन सुरु केले आहे.

मालवणी तालुक्यातील आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी भराडीच्या यात्रेच्या तारखेबाबत दरवर्षी भाविकांमध्ये उत्सुकता असते. या यात्रेची निश्चित तारीख ठरलेली नसल्याने आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ धार्मिक प्रथा परंपरा जोपासत देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवितात. त्यानुसार आज सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात धार्मिक विधी पार पाडत देवीला कौल लावला. त्यानुसार 9 फेब्रुवारी 2025 ही देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करून आंगणे ग्रामस्थ मंडळाकडून जाहीर करण्यात आली. यात्रा तारीख निश्चित झाल्याचे समजताच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साह आहे.

भराडी देवीच्या यात्रेला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यातूनही लाखो भाविक उपस्थिती दर्शवून देवीच्या चरणी नतमस्तक होतात. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने येणाऱ्या भाविकांनी यात्रेसाठी आपले नियोजन सुरु केले आहे. भाविकांकडून सुट्टीचे नियोजन तसेच प्रवासासाठी रेल्वे व बस बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे.

Comments are closed.