IND vs SA: किंग कोहलीचा जलवा कायम! आफ्रिका विरुद्ध सलग दुसरं तर वनडे कारकिर्दीतील ठोकल 53वं आंतरराष्ट्रीय शतक
शाखांवरून तुटणारी ती पाने आम्ही नाही, वादळाला सांगा आपल्या मर्यादेत राहा. ह्या ओळी विराट कोहलीला अगदी तंतोतंत लागू होतात. (king kohli back to back century) रांचीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘किंग कोहली’ने आता रायपूरमध्येही धमाकेदार शतक ठोकले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या विराटने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि अवघ्या 90 चेंडूंमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 84 वे शतक पूर्ण केले.
रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यावर विराट कोहली मैदानावर आला. कोहलीने आपले खातेच षटकार मारून उघडले. त्यानंतर विराटने रायपूरमध्ये चौकार-षटकारांचा वर्षाव केला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कोहलीने आपला गिअर बदलला आणि आफ्रिकेच्या गोलंदाजीला अक्षरशः नेस्तनाबूत केले. विराटने आपल्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीतील 53 वे शतक फक्त 90 चेंडूंमध्ये पूर्ण केले. शतकापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने 7 चौकार आणि 2 उंच षटकार मारले. टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj gaikwad) मिळून दुसऱ्या विकेटसाठी 194 धावांची विक्रमी भागीदारी केली.
यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत रांचीमध्ये कोहलीचा बॅट तळपली होती. तिथे त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वे शतक झळकावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. 120 चेंडूंच्या त्या खेळीत किंग कोहलीने 135 धावा केल्या होत्या, ज्यात 11 चौकार आणि 7 उंच षटकार सामील होते.
विराट एका फॉरमॅटमध्ये (ODI) सर्वाधिक शतकं करणारा फलंदाजही बनला आहे. रांचीमध्ये त्याने 52वे वनडे शतक झळकावून सचिन तेंडुलकरला मागे टाकले होते.
दुसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडची बॅटही चांगलीच चालली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराजने जबरदस्त आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या 83 चेंडूंमध्ये 105 धावांची धडाकेबाज खेळी केली. आपल्या या डावात ऋतुराजने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. ऋतुराजच्या बॅटमधून निघालेले हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठरले.
Comments are closed.