वनडे कारकिर्दीत पहिलं शतक ठोकत ऋतुराजने रचला इतिहास! जलद शतक ठोकण्याच्या बाबतीत ‘या’ दिगजाला मागे सोडलं

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 77 चेंडूंमध्ये आपले पहिले वनडे शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिलेच एकदिवसीय शतक आहे.
त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची मोठी भागीदारी केली.

गायकवाड 105 धावांवर असताना यानसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऋतुराज गायकवाड जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा भारताने 62 धावांवर 2 विकेट्स गमावले होते. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yshasvi jaiswal) पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यामुळे धावांची गती मंदावेल अशी अपेक्षा होती, पण कोहली आणि गायकवाडने असे होऊ दिले नाही. दोघांनीही संयमाने डाव पुढे नेला आणि जोरदार प्रहार केला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (Odi Series IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 77 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या यादीत त्याच्या पुढे फक्त युसूफ पठाण आहे, ज्याने 2011 मध्ये 68 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. ऋतुराजचा हा केवळ 8वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता आणि याआधी त्याला एकदाच 50 हून अधिक धावा करता आल्या होत्या.

रांचीनंतर विराट कोहलीने रायपूरमध्येही शतक झळकावले. त्याने 93 चेंडूंमध्ये 102 धावांची खेळी केली, ज्यात 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. हे कोहलीचे 84 वे आंतरराष्ट्रीय आणि 53 वे वनडे शतक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे विराट कोहलीचे 7 वे वनडे शतक आहे. यामुळे तो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके (7 शतके) झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने क्विंटन डी कॉक (6 शतके) याला मागे टाकले आहे.

Comments are closed.