भाजप करतोय जनतेची हेरगिरी! उद्धव ठाकरे यांचा ‘संचार साथी’वरून हल्ला

केंद्र सरकारने हेरगिरीसाठी वापरण्यात येणाऱया पेगासस तंत्रज्ञानाचे नाव ‘संचार साथी’ असे ठेवले असून त्याद्वारे भारतीय जनता पक्ष देशातील जनतेची हेरगिरी करतोय, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱया लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱया दहशतवाद्यांवर पाळत ठेवावी, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
‘मातोश्री’ निवासस्थानी नवी मुंबईतील शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱयांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कारस्थानाचा पर्दाफाश केला.
राजभवनाचे लोकभवन व पीएमओचे सेवातीर्थ करण्यात आले आहे. या नामकरणाआडून आणखी एक गोष्ट भाजप करत आहे. काही वर्षांपूर्वी जनतेच्या मोबाईलमध्ये पेगासस तंत्रज्ञान टाकून भाजप हेरगिरी करत होता. त्या पेगाससचे नाव बदलून ‘संचार साथी’ करण्यात आले आहे. ते अॅप देशातील प्रत्येक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले जाणार आहे. म्हणजेच भाजप जनतेची हेरगिरीच करत आहे.
दिल्ली बॉम्बस्पह्टावर भाजप बोलत नाही
दिल्ली बॉम्बस्पह्टावर भाजप बोलत नाही. बॉम्बस्पह्ट झाले कसे? त्यात किती लोक गेले? ते बॉम्बस्पह्ट कुणी केले? पहलगाममध्ये अतिरेकी घुसले कसे? त्या गोष्टींवर भाजप सरकारचे लक्ष नाही. पण ज्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेच्या हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनाही भाजपसोबत 2019 पर्यंत होती, ज्या लोकांनी भाजपवर विश्वास दाखवला, त्या लोकांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. एवढा कर्मदरिद्रीपणा आजवर कुणी केला असेल असे वाटत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.