हरियाणा: हरियाणामध्ये ग्रामसचिव निलंबित, जाणून घ्या कारण

हरियाणा बातम्या : हरियाणात सिरसा जिल्ह्यातील रोडी गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील २४० पात्र कुटुंबांना योजनेंतर्गत घरे मिळायला हवी होती, मात्र सर्वेक्षणात फेरफार करून त्यांना अपात्र घोषित करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामसचिव आझाद हर्षवाल यांना निलंबित करण्यात आले आहे, तर सरपंच दर्शन सिंग यांना तिसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नोंदीत कायमस्वरूपी घरे दाखवून 152 कुटुंबांना योजनेतून वगळण्यात आल्याचे तपास अहवालात समोर आले आहे, तर यातील अनेक कुटुंबांकडे राहण्यासाठी योग्य जागाही नाही. तसेच गावातील 63 कुटुंबांना गैरहजर तर 3 जणांना मृत घोषित करण्यात आले. योजनेचा लाभ न मिळाल्याने काही कुटुंबांनी हताश होऊन आपले प्लॉट विकून गाव सोडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने तपास केला, त्यात मोठी अनियमितता समोर आली. जिल्हा परिषदेचे सीईओ सुभाष चंद्रा यांनी सांगितले की, उपायुक्त शांतनु शर्मा यांच्या आदेशानुसार सरपंचांना तिसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. गोरगरिबांना मिळणाऱ्या हक्क आणि योजनांचा लाभ सुरक्षित ठेवता यावा, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.