पन्नालाल सुराणा यांचे निधन

समाजवादी चळवळीचा आधारवड मानले जाणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळीचा एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात आले.
पन्नालाल सुराणा राज्यातील राजकीय व सामाजिक स्थित्यंतरांचे मागील सात दशकांपासून साक्षीदार होते. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे ते मुक्कामी होते. रात्री जेवण केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांना उलटी झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले; पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पन्नालाल सुराणा यांचा जन्म 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांनी महाविद्यालयीन जीवनातच राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते म्हणून सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात केली. सुराणा यांनी भूदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून कामकाज पाहिले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पन्नालाल सुराणा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
मुला-मुलींचे आयुष्य घडविले
पन्नालाल सुराणा यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. मराठवाडय़ातील भूपंपानंतर त्यांनी सर्वस्व गमावलेल्या मुलांसाठी नळदुर्ग येथे ‘आपले घर’ (अपना घर) सुरू केले. या माध्यमातून त्यांनी शेकडो मुला-मुलींचे आयुष्य घडविले. भूमिहीन शेतकऱयांना जमीन मिळवून देण्यासाठी संघर्ष केला.

Comments are closed.