रेखा गुप्ता 'क्लीन एअर' पॅनलच्या अध्यक्षपदी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीला गंभीर हवा प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी दिल्ली सरकारने एका विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत प्रदूषण तज्ञ आणि संशोधकांचाही समावेश करण्यात येणार असून ज्यांच्यामुळे दिल्लीचे वातावरण प्रदूषित होत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची योजनाही सज्ज करण्यात आली आहे. दिल्लीतील हवा सातत्याने प्रदूषणाच्या उच्च पातळीवर असल्याने नागरिकांना प्रकृतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या समितीची स्थापना करण्याची घोषणा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदरसिंग सिरसा यांनी बुधवारी केली. दिल्ली सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदूषण आणि पर्यावरणाशी संबंधित सर्व विभागांना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. या सर्व विभागांनी एकत्रितरित्या काम करुन दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या समस्येवर लवकार लवगर तोडगा काढावा, असा हा आदेश आहे. त्यानुसार सर्व विभागांना कामाला लावण्यात आले असून प्रदूषणाचे संकट टाळण्यासाठी कोणत्या प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, यासंबंधी सूचना करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. समितीमध्ये मान्यवर शास्त्रज्ञांचाही समावेश करण्यात येणार असून त्यांच्या सूचनांना विशेष महत्व दिले जाईल. प्रत्येक उपाययोजना शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारशी चर्चा
दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी वायू प्रदूषणाच्या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रदुषणाच्या कारणांचा शोध घेण्यात येत असून ती कारणे संपविल्यास प्रदूषणाच्या समस्येतून मुक्ती मिळू शकते. याकामी दिल्लीच्या शेजारच्या राज्यांचेही साहाय्य घेतले जाणार आहे. दिल्लीची प्रदूषण पातळी जगातील अनेक तशा प्रकारच्या शहरांच्या तुलनेत बरीच जास्त आहे. अनेकदा ती धोकादायक पातळीपेक्षाही अधिक होत असल्याने सरकार चिंतेत असून तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार दिल्ली सरकारने केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.