Child Ear Piercing Care: कान नाक टोचण्यासाठी मुलांचं योग्य वय कोणतं?
आजच्या काळात कान आणि नाक टोचणे ही फक्त परंपरा राहिलेली नाही तर फॅशनचाही एक भाग बनला आहे. अनेक पालक आपल्या मुलींचे कान-नाक बालपणातच टोचून घेतात. काही जण हे जन्मानंतर लगेच करतात, तर काही मुलं मोठी झाल्यावर. पण खरंच छोट्या मुलांचं कान किंवा नाक टोचण्यासाठी योग्य वय कोणतं असतं? हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. चुकीच्या वयात किंवा चुकीच्या पद्धतीने कान-नाक टोचल्यास त्रास, सूज, अॅलर्जी किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे योग्य माहिती असणे आवश्यक आहे. (ear nose piercing for kids right age care and safety)
कधी करू नये कान-नाक टोचणे?
साधारणपणे बाळं 6 महिने ते 1 वर्षांची असताना त्यांचे कान आणि नाक खूप नाजूक असतात. या वयात अवयवांची वाढ सुरू असते. त्वचा पातळ आणि संवेदनशील असल्याने या काळात टोचल्यास त्या ठिकाणी आकार बदलणे, जखम ठिक न होणे, अॅलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या वयात कान-नाक टोचणे टाळावे.
योग्य वय कोणते?
तज्ञांच्या मते मुलांचे कान-नाक टोचण्यासाठी सर्वात योग्य वय 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. या वयात मुलांचे कान आणि नाक व्यवस्थित आकार घेतलेले असते, त्वचा थोडी मजबूत झालेली असते आणि जखम लवकर भरते. त्यांना हलका त्रासही समजतो, त्यामुळे काळजी घेणं सोपं जातं. त्यामुळे 3 ते 5 वर्षे हे वय अनेक दृष्टीने सुरक्षित मानलं जातं.
टोचताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
कान किंवा नाक टोचताना स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वापरलेली उपकरणे पूर्ण स्वच्छ आणि निर्जंतुक असणे आवश्यक आहे. टोचण्याचे ठिकाण स्वच्छ करून मुलाला कमीत कमी त्रास होईल अशी पद्धत वापरावी. शक्य असल्यास व्यावसायिक आणि अनुभव असलेल्या व्यक्तीकडूनच कान-नाक टोचून घ्यावे.
टोचल्यावर जखमेची काळजी योग्यरीत्या घेतली तर त्रास टाळता येऊ शकतो. हात धुऊनच कानातलं लावणे किंवा काढणे, रोज ठराविक वेळेला जागा साफ करणे आणि जखमेवर दबाव न येऊ देणे महत्त्वाचे असते.
अॅलर्जी असलेल्या मुलांसाठी विशेष खबरदारी
काही मुलांना धातूंनी अॅलर्जी होते. त्यामुळे आधीच तपासा की सोनं, चांदी किंवा इतर कोणत्या धातूवर अॅलर्जी आहे का. नसेल तर सुरक्षित पर्याय म्हणून हायपोअॅलर्जेनिक धातूंचे कानातले वापरणे उत्तम. जर मुलाला त्वचेची समस्या, एक्झिमा, अॅलर्जी किंवा काही इतर त्रास असेल तर कान-नाक टोचण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कान-नाक टोचणे हा मुलांच्या जीवनातील एक सुंदर आणि आठवणीत राहणारा क्षण असतो. पण तो सुरक्षित आणि योग्य रीतीने झाल्यास मुलाला त्रास होत नाही. त्यामुळे योग्य वय निवडणे, स्वच्छता राखणे आणि मुलाच्या सोयीचा विचार करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते.
Comments are closed.