12 नक्षलवादी ठार; तीन जवानही शहीद झाले
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये चकमक : सर्व मृतदेह हाती
वृत्तसंस्था/ रायपूर
भारताला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू असतानाच छत्तीसगडमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. विजापूर जिह्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याचदरम्यान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. बुधवारी सकाळपासून सुरू झालेली ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर आणि दंतेवाडा जिह्याच्या सीमेवर असलेल्या गंगलूरच्या जंगलात बुधवारी सकाळपासून सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली होती. जवानांनी नक्षलवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीमध्ये 12 माओवादी ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या प्रतिहल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ही चकमक विजापूरच्या गंगलूर भागात झाली. घटनास्थळी सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान दाखल झाले आहे.
दंतेवाडा डीआयजी कमलोचन कश्यप यांनी बुधवारी सायंकाळी नक्षलविरोधी मोहिमेसंबंधी अधिकृत माहिती दिली. सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून सायंकाळपर्यंत 12 जणांचे मृतदेह हाती लागल्याचे सांगण्यात आले. या चकमकीत डीआरजीचे तीन जवानही हुतात्मा झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सैनिकांनी मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा घेराव घातला आहे. चकमक अजूनही सुरू असून अतिरिक्त फौजफाटा मागवून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शस्त्रसाठाही जप्त
सुरक्षा दलाने घटनास्थळावरून सिंगल लोडिंग रायफल्स (एसएलआर), इन्सास रायफल्स, आणि इतर शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा जप्त केल्याचेही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. डीआरजी विजापूरचे हेड कॉन्स्टेबल मोनू वडादी, कॉन्स्टेबल डुकारू गोंडे आणि जवान रमेश सोधी हे चकमकीत हुतात्मा झाले, तर डीआरजीचे दोन इतर कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. जखमी जवानांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पुढील वैद्यकीय उपचारांसाठी योग्य व्यवस्था करण्यात येत आहे.
दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार
सकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. पोलिसांनी गंगलूर परिसरात नक्षलवाद्यांना वेढा घातला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो. सुरक्षा दलांना विजापूरच्या गंगलूर परिसरातील जंगलात नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), विशेष कृती दल (एसटीएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांचे संयुक्त पथक त्या भागात पाठवण्यात आले आहे. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले.
छत्तीसगडमध्ये चालू वर्षात 275 नक्षली ठार
2025 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा 275 वर पोहोचला आहे. यापैकी 239 नक्षलवादी बस्तर प्रदेशात मारले गेले. या क्षेत्रामध्ये विजापूरसह सात जिल्हे समाविष्ट आहेत. रायपूर प्रदेशातील गरियाबंद येथे सत्तावीस आणि दुर्ग प्रदेशातील मोहला-मानपूर-अंबागड चौकी जिह्यात दोन नक्षलवादी मारले गेले.
Comments are closed.