आयपीएलपूर्वी KKR च्या गोलंदाजाचा भीमपराक्रम! T20 क्रिकेटमध्ये गाठलं नवं शिखर

आयपीएलचा पुढील हंगाम मार्चपासून खेळवला जाणार आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या एका दिग्गज गोलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून जगप्रसिद्ध सुनील नारायण आहे, ज्याने टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी यापूर्वी फक्त दोन गोलंदाजांनी केली आहे.

सुनील नारायणने टी20 क्रिकेटमध्ये 600 बळी पूर्ण केले आहेत. यासह, तो टी20 मध्ये ही कामगिरी करणारा फक्त तिसरा गोलंदाज आणि जगातील दुसरा फिरकी गोलंदाज बनला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खान यांनी ही कामगिरी केली होती. आयएलटी20 2025-26 च्या दुसऱ्या सामन्यात नारायणने आपला 600 वा बळी घेतला. अबू धाबी नाईट रायडर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात नारायणने इंग्लंडच्या टॉम अबेलला बाद करून ही कामगिरी केली. सुनील नारायण आयएलटी20 मध्ये अबू धाबी नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याने हंगामातील त्याच्या संघाच्या पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

राशिद खान – ६८१
ड्वेन ब्राव्हो – 631
सुनील नारायण- 600
इम्रान ताहिर – 570
शाकिब अल हसन – ५०४

नारायणच्या नेतृत्वाखाली अबू धाबी नाईट रायडर्सने त्यांच्या आयएलटी20 मोहिमेची सुरुवात शारजाह वॉरियर्सचा पराभव करून विजयाने केली. लियाम लिव्हिंगस्टोनच्या स्फोटक खेळीमुळे, अबू धाबीने त्यांच्या 20 षटकांत 4 गडी गमावून 233 धावांचा मोठा आकडा गाठला. लियामने 38 चेंडूत फक्त 2 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार मारत नाबाद 82 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 215.78 होता.

अबू धाबी नाईट रायडर्सच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, टिम डेव्हिडच्या शानदार खेळीनंतरही शारजाह वॉरियर्सला केवळ 194/9 धावाच करता आल्या. अशाप्रकारे, नारायणच्या संघाने हंगामातील पहिला सामना 39 धावांनी जिंकला.

Comments are closed.