देशभरात १९० हून अधिक Indigo ची उड्डाणे रद्द, नेमकं काय आहे कारण?

देशभरात मोठ्या संख्येने इंडिगो विमानांची उड्डाणे रद्द होत आहेत. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये इंडिगोच्या १९० पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, पुण्यात तर उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या निषेध प्रदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. यातच इंडिगोचे उच्च अधिकारी मंगळवारी दुपारी डीजीसीए (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) कार्यालयात पोहोचले असून, या संपूर्ण प्रकाराची चौकशी आणि समीक्षा करण्यात आली. पण यामागचं नेमकं कारण काय आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उड्डाण रद्द होण्याचं मुख्य कारण काय?
इंडिगो एअरलाइन्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ऑपरेशनल अडचणी निर्माण झाल्या आहेत. विमानांचा वेळेवर हालचाल न होणे, विमाने अनेक विमानतळांवर दीर्घकाळ बेमध्ये पार्क करणे आणि क्रू मेंबर्सची कमतरता, यामुळे विमानतळांवर कोंडी निर्माण झाली आहे. इंडिगोचे विमान पार्किंग स्पॉटवर जास्त वेळ थांबलेले असल्याने इतर एअरलाइन्सच्या (एअर इंडिया, अकासा आणि स्पाइस जेट) उड्डाणांनवरही याचा परिणाम झाला आहे. देशभरातील विमानतळांवर हा गोंधळ वाढतच आहे.
आज सकाळीही इंडिगोला मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करावी लागली आणि यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डीजीसीएने इंडिगोच्या अधिकाऱ्यांना आज बोलावून घेतेले. अनेक विमानतळांवर इंडिगोची विमाने थांबविण्यात आल्यामुळे हवाई वाहतूक आणि इतर विमान कंपन्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यातच पुणे विमानतळावर प्रवाशांनी निदर्शने केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी डीजीसीए इंडिगोच्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.


Comments are closed.