अमेरिकेत लढाऊ विमान कोसळले, एकाच वर्षात आठव्यांदा F-16 चा अपघात

अमेरिकेत गुरुवारी अमेरिकन हवाई दलाचे एफ-१६ लढाऊ विमान कोसळले. अपघाताच्या काही सेकंद आधी पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि त्याचा जीव वाचला. दक्षिण कॅलिफोर्नियातील ट्रोना जवळील एका वाळवंट भागात हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री १२:३० वाजता हा अपघात झाला. ट्रोना विमानतळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले.
या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ विमान वेगाने खाली पडत असल्याचे आणि पायलट पॅराशूटने बाहेर पडताना दिसत आहे. विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, या वर्षी F-16 विमान कोसळण्याची ही आठवी वेळ आहे. याआधी पोलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये हे लढाऊ विमान कोसळले आहे, ज्यामध्ये सर्वाधिक अपघात युक्रेनमध्ये (तीन वेळा) आणि अमेरिकेत (दोन वेळा) झाले आहेत.

Comments are closed.