धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
ठाणे : मतदार (Voter) याद्यांमधील घोळाचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. कुठे दुबार, तिबार मतदारांची नोंदणी झालेली आहे, तर कुठे मतदारांचा पत्ताच बदलला आहे. काही ठिकाणी मतदारांचे नाव दुसऱ्याच विधानसभा मतदारसंघात आहेत, तर कुठे तालुकाच बदललला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांच्या, भावी उमेदवारांच्या नावातही अशीच गडबड झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता, ठाणे (Thane) शहरातील माजी नगरसेवकाचेच नाव मतदार यादीतून वगळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.
माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे, भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये, गतवर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण येथील प्रभागातून, मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला होता हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, अनावधानाने सुधीर भगत यांचं नाव वगळण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाने मान्य केलं आहे. दरम्यान, मतदार यादीतील या घोळामुळे मुंब्रा भागातील नगरसेवकांना प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
सुधीर रामचंद्र भगत यांचं नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत समाविष्ट होते. विधानसभा 2024 च्या निवडणुकीत त्यांनी मतदान केलेले होते. त्यानंतर, कोणत्याही प्रकारची निवडणूक नसल्याने त्यांनी मतदार यादी तपासली नाही. तथापि आगामी कालावधीत होऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 च्या अनुषंगाने नोव्हेंबर 2025 मध्ये वादी यांनी त्यांच्या मतदारयादीतील नावाबाबत ऑनलाईन तपासणी /पडताळणी केली असता त्यांचे नाव मतदारयादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, भगत यांनी मतदार नोंदणी अधिकारी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात चौकशी केली असता सदरचे नाव माहे मार्च 2025 मध्ये वगळणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, नाव वगळणीबाबत विलंबाने अपील अर्ज दाखल करुन त्यांनी अपील ग्राह्य धरण्याबाबत विनंती केली. दरम्यान, सुधीर भगत हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी कुटुंबीयांसह ७०-७५ वर्षांपासून राहत असून सदर भागात प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. यादी भाग क्र. 242 चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सदर नाव वगळणीबाबत कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. तसेच नमूना क्र. 7 अर्जावरील स्वाक्षरी वादी यांची नसून त्रयस्त व्यक्तीकडून नमूना क्र.7 अर्ज दाखल करून सदरची वगळणी करण्यात आली आहे. त्याबाबत कोणतीही सूचना किंवा म्हणणे मांडण्याची संधी तक्रारदारास देण्यात आली नाही. त्यामुळे, त्यांनी आपली खंतही व्यक्त केली होती. अखेर निवडणूक आयोगाने त्यांची चूक मान्य केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून चूक मान्य
सुधीर रामचंद्र भगत या नावाच्या दोन भिन्न व्यक्ती असून अनवधानाने वादी यांचे नाव वगळले गेले आहे, असे मतदार नोंदणी अधिकारी यांनी म्हटले. वादी यांना नाव वगळलेबाबत ज्ञात नसल्याने त्यांनी मुदतीत अपील दाखल केले नाही. त्यामुळे, त्यांचा विलंब माफ करत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. वादी यांचे नाव सन 1995 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पर्यंत 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचे दिसून येते, असेही जिल्हा प्रशासनाने मान्य केलं आहे.
हेही वाचा
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
आणखी वाचा
Comments are closed.