दुबार मतदार ते महापालिका निवडणुकांच्या तारखा, निवडणूक आयोगाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
निवडणूक आयोगाची बैठक : आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोगाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यातल्या सगळ्या महानगर पालिकांमधील दुबार मतदानाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर च्या जवळपास निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी; तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा.
संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे.
आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.