हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?


हैदराबाद: बीसीसीआयची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरु आहे. भारताच्या राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू त्यांच्या राज्याकडून या स्पर्धेत खेळत आहेत. भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या बडोद्याच्या संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दोन सामने खेळला. बडोदा विरुद्ध पंजाब आणि बडोदा विरुद्ध गुजरात या दोन सामन्यात हार्दिक पांड्या बडोद्याकडून खेळला. हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी हैदराबादमध्ये मोठी गर्दी होत असल्यानं आयोजकांना मैदान बदलावं लागल्याचं समोर आलं आहे. हार्दिक पांड्याची भारताच्या टी 20 संघात निवड देखील झाली आहे.

आयोजकांवर सामना दुसऱ्या मैदानात हलवण्याची वेळ

हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बडोद्याकडून तीन सामने खेळेल अशी शक्यता होती. बडोदा विरुद्ध पंजाब ही मॅच हैदराबादच्या जिमखाना मैदानावर पार पडली होती. त्या मॅचमध्ये एका चाहत्यानं मॅच सुरु असताना धावत जाऊन हार्दिक पांड्यासोबत सेल्फी काढली होती. हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी अनपेक्षितपणे वाढणारी गर्दी आणि सुरक्षेच्या कारणावरुन बडोदा विरुद्ध गुजरात या सामन्याचं आयोजन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मैदानावर करण्यात आलं.

बडोद्याचा दोन्ही सामन्यात विजय

हार्दिक पांड्यानं बडोद्याकडून पंजाब आणि गुजरात विरुद्धचे सामने खेळले. या दोन्ही सामन्यात बडोद्याला विजय मिळाला. हार्दिक पांड्यानं पंजाब विरूद्धच्या सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करताना  1 विकेट घेत 52  धावा दिल्या होत्या. तर, गुजरात विरुद्ध हार्दिक पांड्यानं  4 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 16  धावा दिल्या. हार्दिकनं पंजाब विरुद्ध नाबाद 77 धावांची खेळी करत बडोद्याला विजय मिळवून दिला होता. तर, गुजरात विरुद्ध त्यानं तो 10  धावा करुन बाद झाला. त्याची विकेट रवि बिश्नोईनं काढली.

हार्दिक पांड्या बडोद्याकडून तीन सामने खेळेल अशी शक्यता होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याची निवड झाल्यानं बडोदा संघासोबतचा त्याचा प्रवास संपला आहे. हार्दिक पांड्यानं दोन सामन्यात बडोद्यासाठी दमदार कामगिरी केली. बडोदा विरुद्ध हरियाणा ही मॅच 6 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच हार्दिक पांड्या टी 20 मालिकेच्या तयारीसाठी कटकमध्ये लवकर दाखल होणार आहे.

हार्दिक पांड्या आशिया चषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे, टी 20 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता. आता हार्दिक पांड्यानं टी 20 संघात कमबॅक केलं आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.