जिजाबाई भोसले उद्यानातील आणखी एक वाघ दगावला! शक्तीआधीच रुद्रचा मृत्यू झाला होता…एक महिन्यापासून बातमी लपवून ठेवली

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामधील आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या उद्यानातच जन्मलेल्या या तीन वर्षीय वाघाचे नाव ‘रुद्र’ असे होते. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी या ठिकाणच्या ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ही माहिती पालिकेने दहा दिवस लपवली होती. यावेळी तर ‘रुद्र’ वाघाच्या मृत्यूची माहिती पालिकेने चक्क एक महिन्याहून जास्त काळ लपवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राणी बागेतील ‘शक्ती’ आणि ‘करिश्मा’ यांचा हा ‘रुद्र’ वाघ होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रक्तामध्ये जंतुसंसर्ग झाल्याने तो आजारी होता. अखेर 29 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला, मात्र हा मृत्यू पालिकेने लपवून ठेवला. यामागे नेमके कारण काय, हे उद्यान प्रशासन सांगायला तयार नाही. त्यामुळे संशय आणखी बळावला आहे. कोणत्याही व्याघ्र प्रकल्पातील वाघाचा मृत्यू झाला तर संबंधित प्रशासन तातडीने ही माहिती जाहीर करते. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, कोणते उपचार केले किंवा नेमका कोणत्या कारणाने मृत्यू झाला याची माहिती दिली जाते. मात्र राणी बाग प्रशासन ही माहिती का लपवत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रशासन म्हणते…

‘रुद्र’ वाघ जन्मल्याच्या तिसऱ्या महिन्यापासूनच आजारी होता. त्याच्यावर नियमित उपचारही सुरू होते. या आजारातून तो दोन वेळा पूर्णपणे बरादेखील झाला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ब्लड पॅरासाइटच्या इन्फेक्शनने तो जास्त आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते, मात्र त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याची प्रकृती खालावत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments are closed.