ऑस्ट्रेलियन भूमीवरही रुट ‘शतकवीर’ 12 वर्षांनंतर शतकाचा दुष्काळ संपला; स्टार्कची विक्रमी कामगिरी

तब्बल 12 वर्षे आणि 29 डावांचा संयमाचा कस लागल्यानंतर अखेर जो रुटने ऑस्ट्रेलियन भूमीवर आपले पहिले वहिले शतक ठोकले आणि ‘अॅशेस’मधील आपल्या शतकांचा ओघ कायम ठेवला. रुटच्या चाळिसाव्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 9 बाद 325 अशी मजल मारली असली तरी मिचेल स्टार्कच्या झंझावाती सहा विकेटमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची पहिल्या दिवशी चांगलीच परीक्षा घेतली.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात स्टार्कने बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 5 अशी केली होती. स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन जल्लोषाचा आवाज घुमत असतानाच, क्रीजवर उतरलेल्या रुटने इंग्लंडचा डाव पुन्हा सावरला. पहिल्या कसोटीतील दारुण कामगिरीनंतर रुटची आजची खेळी इंग्लंडसाठी मनोधैर्य उंचावणारी ठरली. त्याने 40 वे शतक गाठले असून आता त्याच्या पुढे सचिन (51), पॅलिस (45) आणि पॉण्टिंग (41) हे दिग्गज फलंदाज आहेत.

रुट आणि झॅक क्रावली (76) यांच्यात 117 धावांची भक्कम भागीदारी झाली आणि इंग्लंड 3 बाद 122 वर पोहोचला. त्यानंतर हॅरी ब्रुकसोबत रुटने 54 धावांची भागीदारी करत डावाला स्थैर्य दिले, मात्र स्टार्कने एकवेळ 4 बाद 210 अशा स्थितीत  असलेल्या  इंग्लंडला एका पाठोपाठ हादरे देत  त्यांची अवस्था 9 बाद 264 अशी केली. मग रुट आणि जोफ्रा आर्चर यांनी शेवटच्या विकेटसाठी 61 धावांची अभेद्य भागीदारी करत इंग्लंडला दिवसअखेर 9 बाद 325 पर्यंत नेले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनला वगळून पाच वेगवान गोलंदाजांसह खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

स्टार्कचा डावखुरा नंबर वन

मिचेल स्टार्कने या सामन्यात हॅरी ब्रूकला बाद करत आपल्या कसोटी कारकीर्दीतील 415 वा विकेट मिळवला आणि त्याने वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचा (414 विकेट) विक्रम मोडीत काढला. परिणामी, स्टार्क कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने 104 कसोटी सामन्यांत हा टप्पा गाठला. गेल्या चार डावांत स्टार्कने तिसऱयांदा सहा विकेट टिपण्याची किमया साधली.

Comments are closed.