बाबरी मशीद बांधणार, नवा पक्षही काढणार

ममता बॅनर्जीच्या अॅक्शननंतर आमदार हुमायूं कबीर यांची घोषणा

वृत्तसंस्था/कोलकाता

पश्चिम बंगालमधील आमदार हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद उभारण्याची शपथ घेतली आहे. आमदाराच्या या निर्णयामुळे नाराज तृणमूल काँग्रेसने गुरुवारी त्यांना पक्षातून निलंबित केले. पक्षाच्या या कारवाईनंतर हुमायूं यांनी 22 डिसेंबर रोजी नव्या पक्षाची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. हुमायूं यांनी 6 डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यात एक बाबरी मशिदीचे उद्घाटन करणार असल्याचे वक्तव्य यापूर्वी केले होते. हुमायूं यांना त्यांच्या वक्तव्यांसाठी यापूर्वीही इशारा देण्यात आला होता. तरीही ते स्वत:च्या हट्टावर कायम राहिले, ज्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केल्याचा दावा तृणमूल नेते फिरहाद हकीम यांनी केला. बाबरी मशीद उभारणार असल्याची घोषणा आमच्या एका आमदाराने अचानक केली. अचानक बाबरी मशीद का? आम्ही त्यांना यापूर्वीच इशारा दिला होता असे मंत्री हकीम यांनी सांगितले आहे.

6 डिसेंबरच का?

हकीम यांनी कबीर यांच्या या पावलामागे भाजपचे फूट पाडण्याचे राजकारण असल्याचा आरोप करत 6 डिसेंबरच का असा प्रश्न उपस्थित केला. हुमायूं यांनी मशिदीसाठी अन्य नावाची का निवड केली नाही? कबीर हे मुर्शिदाबादमध्ये शाळा किंवा महाविद्यालय निर्माण करवू शकत होते अशा शब्दात हकीम यांनी त्यांना लक्ष्य केले.

भाजपचा हात: हकीम

बंगालला धार्मिक विषयांवर विभागण्याचा प्रयत्न करण्याचे भाजपचे धोरण आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी अशाप्रकारचे कार्ड वापरले आहे. हुमायूं कबीर या फूट पाडण्याच्या राजकारणात सामील झाल्याचे माझे मानणे असल्याचे हकीम यांनी म्हटले आहे.

बाबरी मशीद उभारणारच

मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद कुठल्याही स्थितीत उभारणारच. याकरता पक्षातून बाहेर पडावे लागले तरीही चालेल. बाबरी मशीद उभारण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावण्याची तयारी असल्याची घोषणा हुमायूं कबीर यांनी अलिकडेच केली होती. मुर्शिदाबाद प्रशासनाने अद्याप त्यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिलेली नाही. कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची समीक्षा केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बाबरी मशिदीच्या योजनेवरून वाद

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कार्यरत राहिल्यावर पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतून आमदार झालेले हुमायूं कबीर यांनी 6 डिसेंबर रोजी बाबरी मशिदीकरता पाया रचणार असल्याची घोषणा केली आहे. 6 डिसेंबर या तारखेची निवड राजकीय संदेश असल्याचे मानले जातेय. तृणमूल काँग्रेस 6 डिसेंबर रोजी ‘संघर्ष दिन’ साजरा करतो. राज्य सरकारने यंदा 6 डिसेंबर रोजी सुटीही घोषित केली आहे. परंतु विरोधी पक्ष यावरून सातत्याने ममता बॅनर्जी सरकारवर प्रश्न उपस्थित करत आयोजन रोखण्याची ताकीद देत आहेत. हुमायूं कबीर यांचा मागील काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेच्या नेतृत्वासोबत संघर्ष सुरू आहे.

Comments are closed.