पुन्हा राजदसोबत जाणार नाही: नितीश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले कौतुक
पाटणा : बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सभागृहात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजददरम्यान तीव्र वाक्युद्ध दिसून आले. मी दोनवेळा राजदसोबत गेलो होतो, परंतु राजदच्या नेत्यांनी गडबड केल्याने त्यांची साथ सोडावी लागली. आता पुन्हा राजदसोबत कधीच जाणार नसल्याचे नितीश कुमार यांनी राजद आमदार भाई वीरेंद्र यांना उद्देशून म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राजदकडून तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. नितीश कुमार जेव्हा आमच्यासोबत असतात, तेव्हा भाजप राज्यघटना संपवेल असे म्हणत असतात, तर भाजपसोबत गेल्यावर केंद्र सरकार बिहारला सहकार्य करत असल्याचे म्हणू लागतात, अशी उपरोधिक टीका राजद आमदार कुमार सर्वजीत यांनी केली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी हे बिहारसाठी खूप काम करत आहेत. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमन करावे, असा आग्रह नितीश यांनी केला आहे. आम्ही 20 वर्षांपासून बिहारला विकासाच्या मार्गावर पुढे नेत आहोत. आता बिहारमध्ये भीतीचे वातावरण नाही, तर पूर्वीच्या काळात राज्यात धार्मिक संघर्ष वारंवार व्हायचा, परंतु आता ही स्थिती राहिलेली नसल्याचे नितीश कुमार म्हणाले.
Comments are closed.