लालू कुटुंबीयांना सध्या दिलासा मिळाला आहे
लँड फॉर जॉब प्रकरणात आरोप निश्चिती निर्णय लांबणीवर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालय गुरुवारी निकाल देणार होते. मात्र, न्यायालयाने सध्या निर्णय पुढे ढकलला आहे. आता पुढील सुनावणी आता 8 डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाला गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळाला. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, मीसा भारती, हेमा यादव आणि इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींच्या सद्यस्थितीची पुष्टी करण्यासाठी न्यायालयाने सीबीआयकडून स्थिती अहवाल मागितला आहे. या प्रकरणातील काही आरोपींचा कार्यवाहीदरम्यान मृत्यू झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात 103 जणांना आरोपी म्हणून नाव दिले होते, परंतु त्यापैकी चार जणांचा कार्यवाही दरम्यान मृत्यू झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. या कारणास्तव, न्यायालयाने तपास यंत्रणेला प्रत्येक आरोपीची स्थिती पुन्हा तपासण्याचे आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील पुढील सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.
यापूर्वी 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित करण्याचा आपला आदेश 4 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला होता. राजद प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि इतर या कथित घोटाळ्यात सहभागी आहेत. या कथित घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने लालू कुटुंबियाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
Comments are closed.