राहात्यात 100 रुपयांच्या बनावट नोटा चलनात

राहाता तालुक्यातील गणेश परिसरात 100 रुपयांच्या बनावट नोटांचे एक मोठे जाळे सक्रिय झाले आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाची फसवणूक होत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियासह परिसरातील सर्व प्रमुख पतसंस्थांमध्ये या नोटा मोठय़ा प्रमाणात आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे.

सेंट्रल बँक, गुरुदत्त, वर्धमान आणि दत्तगुरू पतसंस्था यांसारख्या संस्थांमध्ये या बनावट नोटा जमा होत आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यापाऱयांनी त्या स्वीकारल्या आहेत, त्यांना त्या नोटांचे मूल्य परत मिळत नाही. या नोटा ओळखणे सामान्य माणसाला कठीण आहे. व्यापाऱयांच्या मते हा गोरखधंदा श्रीरामपू रमधून चालतोय, की गणेश परिसरातच त्याचे केंद्र आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. 100 रुपयांची नोट असल्याने ती सहजासहजी पकडली जात नाही. त्यामुळे बनावट नोटा बनवणाऱयांचे रॅकेट सध्या जोरात सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये अनेक मोठे गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बँक अधिकारी नोटा ‘डुप्लिकेट’चा शिक्का मारून बाद करतात, पण फसवणूक झालेल्या गरिबांनी तक्रार कोणाकडे करावी, हा गंभीर प्रश्न आहे. या बनावट ‘नोटां’ना तातडीने आळा घालण्यासाठी आणि या रॅकेटला नेस्तनाबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

Comments are closed.